शाश्वत-कालातीत

अमेझॉन चे जेफ बेझोस यांना विचारले होते की भविष्यात काय बदल होतील, तंत्रज्ञान कुठल्या मीडिया जात आहे, नवव्यवसायिकांनी भविष्याकडे कसे लक्ष द्यावे? त्यांनी फार सुंदर उत्तर दिले होते. ते म्हणतात, भविष्यात काय बदलेल यावर लक्ष देण्यापेक्षा काय बदलणार नाही हे लक्षात घेणे अधिक सुलभ आणि महत्त्वाचे आहे. ३० वर्षांपूर्वी जेव्हा अमेझॉन सुरू केली होती तेव्हा लोकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात आणि घरपोच हव्या होत्या. आजही लोकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात आणि घरपोच हव्या आहेत, आणि माझ्या मते भविष्यातही लोकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात आणि घरपोच हव्या असतील. ॲमेझॉन ची आयडिया शाश्वत आणि कालातीत आहे. त्या आयडियाची अंमलबजावणी करण्यासाठीचे तंत्रज्ञान कदाचित बदलत जाईल. पण मूळ आयडिया कालातीत आहे.
प्रसिद्ध गणितज्ञ आणि विचारवंत नसीम निकोलस तलेब यांनी लिंडी इफेक्ट नावाचा एक सुंदर सिद्धांत मांडला आहे. ते म्हणतात एखादी आयडिया जितक्या मोठ्या काळापासून रूढ आहे, तर भविष्यातही तितक्याच किंवा त्याहूनही अधिकारासाठी ती आयडिया रूढीत राहीलच. हे तत्त्वज्ञान आपल्या आयुष्यात खूप गोष्टींना लागू पडते. तुम्हाला कुठली पुस्तकं वाचायची आहेत हे ठरवताना लिंडी इफेक्ट गृहीत धरून पुस्तकांची निवड करता येऊ शकते. जी पुस्तक कालातीत आहेत ती सर्वप्रथम वाचा. उदाहरणार्थ, सिद्धार्थ हे पुस्तक जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी प्रकाशित झाले. हे पुस्तक आजही तितकेच समर्पक आहे आणि माझ्या मते अजून हजार वर्षांनी ही या पुस्तकातील संदेशाशी त्याचे वाचक समर्पकता शोधू शकतील. गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान २६०० वर्षे जुने आहे, आजही त्याची समर्पकता तितकीच टिकून आहे. जेव्हा आपण असे कालातीतत ज्ञान शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खरंतर आपण आपला वेळच वाचवत असतो.
मी आज जे काही शिकतो आहे ते माझ्या आयुष्यात अजून किती काळ लागू पडणार आहे त्यानुसार जर मी माझा प्राधान्यक्रम ठरवला तर माझी ज्ञानसाधना शाश्वत रूप घेऊ लागते.
लॉन्ग टर्म इन्वेस्टिंग मध्ये असा विचार केल्याने खूप फायदा देऊ शकणारे पोर्टफोलिओ उभे करता येऊ शकतात.
हीच गोष्ट आयुष्यात बऱ्याच बाबींमध्ये मदत करू शकते. तत्पूर्वी लॉंग टर्म विचार करायला शिकणे आवश्यक आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *