Results or Hardwork?

Workers in a Machine Tool Shop (oil painting)
Workers in a Machine Tool Shop (oil painting) by Douglas Pittuck is licensed under CC-BY-NC-SA 4.0

मागे एकदा एका इंटरेस्टिंग व्यक्तीला भेटलो. ते अमेरिकेत शिकले होते आणि शिक्षण चालू असताना कमाई म्हणून ते कीमेकर (नकली चावी बनवणारा) चे काम करायचे. त्यांनी काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या.
बऱ्याच वेळा लोक चावी विसरल्यामुळे आपल्या घराच्या बाहेर अडकायचे. असे घडल्यावर बरेच लोक तणावात जातात. मग जेव्हा कीमेकर ला पाचारण केल्यावर तो अवतरतो तेव्हा देवदूत अवतरल्यासारखे भासते. हा की मेकर जेव्हा नवखा होता तेव्हा सहजासहजी कुलूप उघडत नसे. त्याला बराच वेळ लागायचा. हे सगळे करत असताना त्याला बरेच कष्ट घ्यावे लागत. खूप वेळा उठ बस करावी लागे. कधी घामाने अंग ओले होऊन जाई. बराच वेळ खटपट केल्यावर शेवटी कुलूप उघडले जाई आणि मग सर्व कुटुंबीय आपल्याच घरात जाऊ शकत. त्यांना एक वेगळा आनंद होत असे. आणि मग की मेकर ला तो मागेल तितके पैसे ते आनंदाने देत असत.
कालांतराने हा कीमेकर आपल्या कामात एक्सपर्ट होऊ लागला. कुलूप उघडायला त्याला कमी वेळ लागू लागला. फार कष्ट पडत नसत. काही दिवसांनी तर तो काही मिनिटातच कुलूप उघडू लागला. त्याचा कामाचा वेग वाढला. तो सहजासहजी कुलूप उघडतो आहे, हे बघून बऱ्याच वेळा लोक त्याला पैसे देताना खळखळ करायचे. ते म्हणायचे की दोन तीन मिनिटांचं तर काम होतं त्यात इतके पैसे का मागताय? त्याने सहज कुलूप उघडले, कमी वेळ घेतला यामुळे त्याच्या श्रमाचे मूल्य लोकांच्या दृष्टीने कमी होऊ लागले.
हा की मेकर हुशार होता, त्याला ही गोष्ट कळली. मग नंतर तो जाणून बुजून हे काम पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ घेऊ लागला. दोन मिनिटात होऊ शकणारे काम वीस तीस मिनिटे रखडून ठेवू लागला. मी खूप कष्ट करतो आहे असे भासवू लागला. तसे केल्यावर त्याचे पैसे देताना खळखळ करणारे ग्राहक कमी होऊ लागले. या अनुभवातून त्याला ही जाणीव झाली की बऱ्याच वेळा किती महत्त्वाचे काम पूर्ण केले यापेक्षा ते काम करताना किती कष्ट केले यावर लोक जास्त इम्प्रेस होतात. स्मार्ट वर्क जरी हार्ड वर्क पेक्षा भारी असले तरी हे लक्षात घ्यावे लागेल की वैयक्तिक निकाल मिळवण्यासाठी स्मार्टवर्क गरजेचे आहे. इतरांसमोर भासवण्यासाठी हार्डवर्क केल्याचे नाटक करावे लागेल.
हा किस्सा इथे संपत नाही, ती व्यक्ती फायनान्स वर्ल्ड मध्ये उच्च पदावर काम करते आहे. आणि ते सांगत होते की, फायनान्स आणि कित्येक क्षेत्रात ही फिलॉसॉफी लागू पडते. बरेच लोक हार्डवर्क केल्याचे भासवतात. स्टॉक मार्केट पोर्टफोलिओ मॅनेजर कडे पोर्टफोलिओ चे नमुने तयार असतात, ते जसेच्या तसे लोकांना विकले जातात. पण त्यापूर्वी असे भासवले जाते की पोर्टफोलिओ मॅनेजर खूप मोठा रिसर्च करतो आहे, कस्टमरचा रिस्क प्रोफाइल जाणून घेऊन त्याच्यासाठी सूटेबल पोर्टफोलिओ बनवतो आहे. हे कष्ट भासवण्यासाठी, कस्टमरची वेगवेगळी माहिती मागितली जाते. हे काम गरज नसताना रखडले जाते, आम्ही अजूनही काम करतो आहोत असे पुन्हा पुन्हा सांगितले जाते. मुद्दाम डेडलाईन चुकवली जाते. आणि मग खूप कष्टाने त्या कस्टमरचा पोर्टफोलिओ बनवला आहे असे भासवले जाते. थोड्याफार फरकाने हीच बाब अनेक क्षेत्रात लागू पडते. कित्येक डॉक्टर्स पेशंटला मोठे मोठे फॉर्म भरायला सांगतात. त्यांची सगळी मेडिकल हिस्टरी जाणून घेण्याच्या नावाखाली पेशंटला इम्प्रेस करतात आणि मग रुटीन ट्रीटमेंट कडे वळतात. या प्रक्रियेतून किती प्रामाणिकपणे पेशंटची हिस्टरी वापरून ट्रीटमेंट प्लॅन बनवला यापेक्षा पेशंटला फार मोठे समाधान लाभते. हे सरसकट प्रत्येक व्यवसायिक करतो असे म्हणणे म्हणजे प्रामाणिक व्यावसायिकांवर अन्याय ठरेल. पण तरीही ही प्रॅक्टिस खूप जन करतात.

आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये किती काम केले यापेक्षा तुमच्या कामाने किती व्हॅल्यू ॲड केली हे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात तासांपेक्षा तुम्ही किती महत्त्वाचा प्रॉब्लेम सोडवला हे महत्त्वाचे आहे. तुम्ही ज्याच्यासाठी काम करता म्हणजे तुमचा एम्प्लॉयर किंवा तुमचा कस्टमर त्याचा तुम्ही किती महत्त्वाचा प्रॉब्लेम सोडवला आणि त्यातून त्याला किती लाभ झाला यावर तुम्हाला मिळणारा मोबदला ठरावा लागतो. पण सगळीकडे असे होत नाही. बरेच लोक पैसे देताना समोरच्याला किती कष्ट पडले हे आधी बघतात. मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. मी जेव्हा एखादी सेवा पुरवतो तेव्हा ते करताना मला किती वेळ लागला यापेक्षा मी माझ्या ग्राहकाचा किती वेळ, पैसा वाचवला आणि त्याचे आयुष्य किती सोपे केले हे महत्त्वाचे.
तसेही आज-काल, प्रत्यक्षात रिझल्ट देणाऱ्या राजकारण्यांपेक्षा, मी अठरा अठरा तास काम करतो असे भसवणारे राजकारणी जास्त प्रसिद्ध आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *