शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ठीक दहा वर्षांनी १६८४ मध्ये सध्याच्या तामिळनाडूमध्ये तंजावर प्रांतात त्यांचा पुतण्या शाहूजी भोसले वयाच्या बाराव्या वर्षी तंजावर प्रांताच्या गादीवर बसला.

शाहूजी भोसले यांची नंतर साहित्य, कला, नाटक इत्यादी क्षेत्रात आवड निर्माण झाली. त्यांच्या दरबारात साहित्यिक आणि कलाकारांचा आदर सत्कार केला जात असे. त्यांना आर्थिक सहाय्य करून दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी प्रेरित केले जात असे. शाहूजी हे स्वतः साहित्यिक होते. त्यांनी काही नाटके लिहिली आहेत. त्यांच्या लिखाणाकडे थोडी नजर टाकली तर लक्षात येईल त्या काळात सुद्धा दक्षिण भारतीय साहित्य किती प्रगल्भ होते. विशेष म्हणजे शाहूजी यांनी त्यावेळी जे लिहिले तशा रूपाचे साहित्य लिहिण्याची आजच्या काळात साहित्यिकांची हिंमत होणार नाही. घाशीराम कोतवाल हा तसा प्रयोग होता. नंतर तसे काही होऊ शकले नाही.
शाहूजी महाराज यांनी “सती दाना सुरामु” नावाचे एक नाटक लिहिले होते. हे नाटक त्या काळातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे होते. या नाटकाचे अनेक प्रयोग त्यावेळी राज दरबारात व इतर महत्त्वाच्या प्रसंगी होत असत. या नाटकातील एक प्रसंग अशा रीतीने लिहिला आहे की आजच्या काळात असे नाटक लिहिण्याची कोणी हिंमत करणार नाही! काय आहे तो प्रसंग?
मन्नारगुडी या शहरात विष्णू मंदिरात मोरोभाटलु नावाचा एक ब्राह्मण पंडित त्याच्या शिष्यांसोबत एका उत्सवासाठी आलेला असतो. त्या पंडिताची नजर एका सुंदर तरुण मुलीवर पडते. आणि त्या मुलीबरोबर प्रणय क्रीडा करण्याची त्या पंडिताला इच्छा होते. त्याच्या भावना इतक्या अनावर होतात की आपल्या मनातले तो त्याच्या शिष्यांनासुद्धा ऐकू येईल अशा भाषेत पुटपुटू लागतो. त्याच्या मनातल्या भावना ओठावर आलेल्या ऐकून त्याच्या शिष्यांना लाजल्यासारखे होते. ते एकमेकांना म्हणू लागतात, “ गुरु आता वेडावले आहेत”.
मग शिष्य आपल्या गुरूला त्यांच्या प्रतिष्ठेची आठवण करून देतो. तेव्हा गुरु उत्तर देतो की मोठेमोठे पुरुष वासनेला बळी पडतात आणि तरीही टिकून राहतात. मग तो शिष्य त्याच्या गुरूला आठवण करून देतो की तुम्हीच शिकवले होते की मादी एखाद्या राक्षसा समान असते, तेव्हा म्हातारा गुरु उत्तर देतो, “अरे वेड्या ती काही राक्षस नाही, ती एक सुंदर स्त्री आहे.” शेवटी निराश होऊन, जेव्हा शिष्य गुरूला “वेद, पुराण आणि शास्त्रे” इत्यादींवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतो जे परमानंदाचा मार्ग आहेत, तेव्हा म्हातारा गुरु शिष्याच्या कानात सांगतो की या तथाकथित “(वेद, पुराण आणि शास्त्रे) परमानंदाचा काही उपयोग नाही, खरा आनंद स्त्री शरीर सुखात असतो.”
नंतर, तो ब्राह्मण गुरु त्या तरुणीकडे जातो आणि म्हणतो, “तुझ्या सौंदर्याच्या मोहिनीने माझी राख झाली आहे. मला तुझ्याशी प्रणय करण्याची फार इच्छा आहे”. ती तरुणी विनम्रपणे गुरूला त्याच्या जात(ब्राम्हण) आणि परंपरेच्या नियमांची आठवण करून देते. म्हणते “मी खालच्या जातीतली आहे”, आम्ही बीफ खातो, दारू पितो, आमच्या जातीच्या लोकांची सावली सुद्धा ब्राम्हण जातीच्या वर्ज्य असते, आपण माझ्याशी सरळ शरीर सुखाची मागणी करताय? आपल्या दोघांना सुद्धा पाप लागेल. नरकात जावे लागेल.”

प्रणयधुंद मोरोभाटलुला कशाचीही पर्वा वाटत नाही. “आम्ही तर फक्त गोमातेचे दूधच पितो,” तो उत्तरतो, “पण तुम्ही तर संपूर्ण गोमाताच खाता. मग तर तुम्ही आमच्यापेक्षा कितीतरी अधिक शुद्ध असणार,” तो उद्गारतो. त्या उत्तराने चकित होऊन, ती तरुणी त्याला वासनेची अनित्यता, धर्माची शाश्वतता आणि इतर धार्मिक-तात्विक तत्त्वांवर व्याख्यान देते, या आशेने की या सगळ्या गोष्टींची आठवण करून दिली तर तो निघून जाईल. तिने मोरोभाटलूला चेतावणी देखील दिली की ती विवाहित आहे आणि त्याने “तिच्यासमोर हे विसंगत बडबडणे” थांबवावे तर तेच सर्वांच्या भल्याचे आहे. पण या सगळ्याचा मोरोभाटलू ब्राह्मणावर काही परिणाम होत नाही. तो अचल राहतो, म्हणतो “आम्ही ब्राह्मणांनी सर्व नियम बनवले आहेत आणि धर्माचा शोध सुद्धा आम्हीच लावला आहे. ब्राह्मणाची वासना शमवण्याइतका चांगला दुसरा धर्म नाही,” मोरोभाटलू हसून पुढे म्हणतो, हवे तर, या कृतीकडे ती तरुणी धर्मकार्य म्हणून सुद्धा पाहू शकते. “चल तुझा कटिप्रदेश माझ्या ताब्यात दे,” तो बिनलाजे पणाने त्या तरुणीला सुचवतो, “जसे दानी लोक ब्राह्मणाला जमीन अर्पण करतात.” (कटिप्रदेश या शब्दाला मराठीत इतर मादक पर्यायी शब्द आहेत, मलाच ते लिहावेसे वाटले नाहीत. तुम्ही समजून घ्या.)
शेवटी, तिथे महिलेचा नवरा येतो, आणि चिडून त्या ब्राम्हण पंडिताला मारहाण करण्याचा प्रयत्न करतो, मग पंडितांचे शिष्य मध्यस्ती करून नवऱ्याला तसे करण्यापासून रोखतात. मग तो नवरा पंडिताबरोबर भांडू लागतो, म्हणतो, “अरे म्हाताऱ्या, तू शास्त्रे वाचली नाहीत का? हे पाप नाही का?” जेव्हा त्या महिलेचा नवरा मोरोभटलूला ईश्वरी मार्गाची आठवण करून देतो तेव्हा तो वासना धुंद म्हातारा मोरोभटलू ब्राह्मण उत्तर देतो: “मुक्ती म्हणजे दुःखापासून नसते, सुखापासून नसते, गुणांपासून नसते आणि अवगुणांपासून सुद्धा नसते, मुक्तीच्या तथाकथित व्याख्या कोणीतरी मुर्खाने केल्या असाव्यात. खरं म्हणजे जेव्हा एखादी मोहक तरुण स्त्री तिच्या कपड्यांपासून मुक्त असते – ती माझ्यासाठी खरी मुक्ती आहे.”
ब्राम्हणाने सांगितलेल्या मुक्तीची व्याख्या ऐकून शेवटी त्या अडाणी पतीला ते खरे वाटते आणि तो पती आपल्या पत्नीला मोरोभटलू ब्राह्मणाच्या हवाली करण्यास तयारी दाखवतो. हे बघून मोरोभटलूचे शिष्य त्याला पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न करतात, “कामवासनेपासून अलिप्त राहा; वैदिक शब्दांच्या सूक्ष्म अर्थाचा विचार करा”).
त्यानंतर घडणाऱ्या घटनांमध्ये, पती खूप अस्वस्थ होतो, पत्नी गोंधळलेली असते आणि शेवटी मंचावर साक्षात शिवाचे आगमन होते आणि मग शिव तिथल्या प्रत्येकाला या संकटातून मुक्त करतो. योग्य अयोग्य काय ते सांगून सगळ्यांचे कान उघडतो.
वरकरणी पाहता “सती दाना सुरमु” हे एक साधे विडंबननाट्य वाटू शकते. पण त्या काळाच्या संदर्भात पाहिल्यास शाहूजी त्या काळच्या समाजावरच विडंबन वापरून भाष्य करत होते. हे नाटक त्याकाळी मोठ्या उत्सवात, यात्रेत सार्वजनिक कार्यक्रमात सादर केले जाई. या नाटकात ब्राह्मण आणि अस्पृश्यांमध्ये असलेल्या त्याकाळच्या दुहीवर भाष्य तर आहेच पण शाहूजी महाराज चतुराईने शिवाला (शाहूजींचे पसंतीचे देवता) समाजात प्रस्तुत करतात (हा आशय समजण्यासाठी शैव आणि वैष्णव वाद समजून घ्यावा लागेल) . तत्कालीन नैतिकता आणि अनैतिकता, वासना आणि स्त्रियांच्या समाजातील स्थानावर या नाटकाने विडंबनाचा उपयोग करून गंभीर प्रश्न उपस्थित केले. शाहूजी महाराजांनी आपल्या लेखन कौशल्याचा वापर करून अशा तत्कालीन सामाजिक प्रशांचा मोठा मुद्दा बनवला होता. तोही हसत खेळत आणि विनोदाचा वापर करून.
Discover more from Vittartha
Subscribe to get the latest posts sent to your email.