तात्पुरते मोह टाळा

chess piece
Photo by Pixabay on Pexels.com

गुंतवणुकीविषयीच्या चर्चेत बऱ्याच वेळा असा तर्क केला जातो की भविष्याची चिंता करून आज तडजोडी का कराव्यात?  मिळाले ते पैसे खर्च करून मजेत आयुष्य का जगू नये? भविष्य कोणी पाहिले? 

खरंतर या  तर्काला काही ठोस उत्तर नाहीये.  ही शेवटी प्रत्येकाची वैयक्तिक चॉईस आहे. तरीही सुखी भविष्यासाठी प्लॅन करायचा असेल तर त्यासाठी चालू वर्तमानात काही निर्णय घ्यावेच लागतील.  आजचे काही मोहाचे क्षण टाळून  भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील.  याच संदर्भातील एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय प्रयोग समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

१९६० साली स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये एक प्रयोग करण्यात आला. चार वर्षांच्या मुलांसमोर थोडी मिठाई ठेवण्यात आली.  आणि त्यांना सांगण्यात आले की ही मिठाई आता लगेच खाता येईल किंवा अजून पंधरा मिनिटे थांबले तर त्यांना अजून जास्त मिठाई देण्यात येईल. आणि त्या मुलांना रूममध्ये एकटे सोडण्यात आले.  पंधरा मिनिटांच्या आत  कोणी मिठाई खाल्ली किंवा न खाता नंतर मिळणाऱ्या मोठ्या बक्षिसासाठी वाट पाहिली याचा डेटा बनवण्यात आला. या मुलांवर कित्येक वर्षांपर्यंत नजर ठेवण्यात आली. हा प्रयोग कित्येक वर्षे चालला.  जी मुलं पंधरा मिनिटे वाट बघू शकली आणि अधिक मोठे बक्षीस घेऊ शकली ती मुलं नंतरच्या आयुष्यात, शिक्षणात, समाजाबरोबरच्या नात्यात, भावनिक दृष्ट्या अधिक सफल होत गेली.  ज्यांना मिठाई लगेच खाण्याचा मोह आवरला नाही त्यातल्या बऱ्याच मुलांना नंतरच्या आयुष्यात खडतर दिवसांना सामोरे जावे लागले, अपयश भोगावे लागले. 

या प्रयोगाला मार्शम्यॅलो टेस्ट म्हणून ओळखले जाते. नंतर अशाच प्रकारचे अनेक प्रयोग करण्यात आले त्यांचे निष्कर्ष ही काही वेगळे नव्हते. 

आजच्या दिवशी काही मोहाचे क्षण टाळून भविष्यातल्या मोठ्या प्रॉब्लेम पासून स्वतःला वाचवता येऊ शकते. आज काही छोट्या तडजोडी केल्या तर भविष्यातील मोठे संघर्ष टाळता येतील हा या प्रयोगामागचा मुख्य संदेश आहे. यालाच Delayed Gratification असेही म्हणतात. आणि Instant Gratification ही त्याच्याविरुद्धची संज्ञा आहे.

Delayed Gratification  ची अनेक उदाहरणे सांगता येतील. जसे शालेय अवस्थेत असताना कोणीतरी टीव्ही बघण्याचा,  व्हिडिओ गेम खेळण्याचा मोह टाळून तो वेळ अभ्यासासाठी वापरतो  आणि मग भविष्यात त्याला अनेक पटींनी त्या Delayed Gratification ची फळे मिळतात. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. 

भविष्य कितीही अनिश्चित असले तरी आपल्या परीने त्याचे प्लॅनिंग नक्कीच करता येईल.

आपण आज ज्या झाडाचे फळे चाखतो ते झाड एका रात्रीत वाढत नाही. एक तर पंधरा-वीस वर्षांपूर्वी आपण किंवा आपल्या आधी इतर कोणीतरी ते लावलेले असते.  की ते चांगल्या गोष्टींची फळे मिळण्यास भरपूर काळ द्यावा लागतो.  आणि तितका संयम बाळगल्यास ती फळे कैक पटीने मिळू शकतात. 

हे गुंतवणुकीविषयी फार जास्त समर्पक आहे. का?

१. आपले उत्पन्न अमर्याद नाही ते कधीही थांबू शकते. 

२. सततच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मागच्या काही दशकांपासून आपले आयुष्यमान वाढलेले आहे,  त्यामुळे रिटायरमेंट नंतर सुद्धा काही दशके आपण जिवंत राहू शकतो पण त्या काळात आपले उत्पन्न चालूच राहील याची शाश्वती नाही.  अगदी साठव्या वर्षापर्यंत जरी काम केले तरी पुढची एक दोन दशके उत्पन्न शिवाय जाऊ शकतात त्यासाठीची तरतूद महत्त्वाची आहे. 

३.  इन्फ्लेशन म्हणजेच महागाई तुमच्या कमाईला खात राहणार आहे.  एक दोन पिढ्यात तुमच्या पैशांचे कैक पटीने अवमूल्यन होऊ शकते.  त्या पैशांना योग्यरीत्या गुंतवलेले नसेल तर इन्फ्लेशन तुम्हाला गरिबीत ढकलू शकते. 

सरकार चित्रपटात एक डायलॉग आहे तो मला फार आवडतो: “नजदिकी फायदा देखने से पहले; दूर का नुकसान सोचना चाहिए.”


Discover more from Vittartha

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

Discover more from Vittartha

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading