Blog

  • आर्थिक चुका टाळण्यासाठी कंपाऊंडिंग / चक्रवाढ दर समजून घ्या.

    “The greatest shortcoming of the human race is our inability to understand exponential growth.” — Albert Bartlett

    मित्र, नातेवाईक एकत्र आल्यावर एका विषयावर चर्चा हमखास होते. अमुक अमुक ठिकाणी जमिनीची, फ्लॅट ची किंमत ही होती आणि आज ती वाढून ती झाली आहे. यात सुरुवातीची किंमत आणि आताची किंमत आणि त्यामधला फरक हे आकडे केंद्रस्थानी असतात. आणि त्यातली वाढ पाहून बरेच जण अचंबित होतात. त्यांच्या मनात FOMO (Fear Of Missing Out) निर्माण होतो.

    उदाहरण. २०१५ साली पुण्यात ४५ लाखांना मिळणारा फ्लॅट आज ६५ लाखांना आहे. किमतीतील हा बदल पाहून बरेच जण अचंबित होतात आणि त्यांना वाटायला लागते की रियल इस्टेट हा पैसे कमावण्याचा ग्रेट मार्ग आहे. या उदाहरणाला घेऊन या आकड्यांकडे कसे बघायला हवे त्याविषयी बोलू.

    किमतीमधला हा बदल पहिला तर २० लाख रुपये फायदा सरळ सरळ दिसतो आहे. पण गुंतवणुकीतील परतावा मोजताना नेहमी चक्रवाढ दराने म्हणजेच दर साल दर शेकडा या दराने किती परतावा मिळाला हे बघणे गरजेचे आहे. द. सा. द. शे दराने सदर उदाहरणात ४.७% परतावा मिळाला आहे. (गुगल वर CAGR Calculator असे सर्च केल्यावर हे गणित करायचे Calculator सापडतील.)

    द. सा. द. शे. ४.७% परतावा काहीच विशेष नाही, का?

    १. २०१५ साली FD वर द. सा. द. शे ८ ते ९ टक्के व्याज मिळत असे.

    २. निफ्टी ५० ने २०१५ ते आज पर्यंत ११% द. सा. द. शे परतावा दिलेला आहे. मागच्या दोन वर्षांपासून निफ्टी पडतच आहे तरीही.

    ३. महागाई वाढीचा सरासरी ७% दर गृहीत धरल्यास हा परतावा आणखी आपटी खातो.

    ४. घरासाठी खर्च केलेले मेंटेनन्स चार्जेस, टॅक्सेस, ब्रोकरेज, स्टॅम्प ड्युटी इत्यादी गृहीत धरल्यास आकडे अधिक वाईट होत जातात.

    चक्रवाढ पद्धतीनेच गुंतवणूकयोग्य सगळ्या माध्यमांचे रिटर्न्स मोजणे आवश्यक आहे. एक वर्ष, काही महिन्यांचा डेटा स्पष्ट चित्र दाखवत नाही. ५-१० वर्षांपेक्षा अधिक काळाचा डेटा बघितला जावा.

    आपण जे कर्ज विकत घेतो त्यांचे हफ्ते सुद्धा द. सा. द. शे. दराने मोजले जातात.

    उद्योग क्षेत्रात ज्याला ग्रोथ म्हणतात ती, जीडीपी ग्रोथ, इन्फ्लेशन म्हणजेच महागाई दर हे सगळे द. सा. द. शे. दराने मोजले जातात. तरच त्यांच्या वाढीचे खरे चित्र दिसू शकते.

    मानवी मेंदू हा घातांक दराचे म्हणजेच चक्रवाढ दराचे गणित सहज समजू शकत नाही हे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. थोडक्यात आपल्याला ८+८+८+८+८+८+८+८+८+८ सहज तोंडी मोजता येतात. पण ८x८x८x८x८x८x८x८x८x८ तोंडी मोजता येत नाहीत.

    ही साधी पण महत्वाची गोष्ट समजली तर बऱ्याच चुका टाळता येतील.

    मला या माहितीने कसे वाचवले?

    काही वर्षांपूर्वी मी पुण्यात फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करत होतो. फ्लॅट च्या डाउन पेमेंट साठीचे पैसे जमा होत नव्हते. खूप प्रयत्न करूनही ते शक्य झाले नाही. शेवटी मी हताश होऊन फ्लॅट ची बुकिंग कॅन्सल केली. हे सगळे होईपर्यंत गुंतवणूकभान आले होते. चक्रवाढ दराचे गणित कळत होते. ज्या दिवशी फ्लॅट ची बुकिंग कॅन्सल केली त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पेन आणि वही घेऊन गणित करत होतो. योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर फ्लॅट साठी पुरेसे पैसे जमा होऊ शकतात हे समजत गेले.  आणि मग ठरवले की अजून काही वर्षात फ्लॅट च्या किमती इतके पैसे जमा करायचे आणि संपूर्ण कॅश मध्ये फ्लॅट घ्यायचा. डाउन पेमेंट साठी जमा केलेले पैसे सगळे शेअर्स मध्ये योग्य पद्धतीने गुंतवले. आज पासूनच गृह कर्जाचा हफ्ता सुरु झाला आहे असे गृहीत धरून संभावित हफ्त्या इतका पैसे दर महिन्याला गुंतवत राहिलो. उत्पन्नामध्ये होणाऱ्या वाढीनुसार गुंतवणूक वाढवत गेलो. गरजा मर्यादित ठेवल्या. या दरम्यान गुंतवणूकदाराचा माईंडसेट बनवण्यासाठी भरपूर वाचन केले. वाचनातून समजलेल्या गोष्टी दररोजच्या व्यवहारात कुठे लागू होतात यावर सतत विचार केला आणि त्यानुसार निर्णय घेतले. त्यानंतर पाचच वर्षात फ्लॅट च्या त्यावेळच्या मार्केट रेट इतकी रक्कम पोर्टफोलिओ मध्ये तयार झाली. म्हणजेच ज्या फ्लॅट साठी डाउन पेमेंट करू शकलो नाही तोच फ्लॅट पाचच वर्षात रोख रकमेत घेण्याची क्षमता बनली. आणि मग चक्रवाढ दराची किमया प्रात्यक्षिक देऊनच समोर उभी राहिली. त्याचवेळी आणखी एक धाडसी निर्णय घेतला. फ्लॅट विकत न घेता भाड्याच्या घरातच राहुन गुंतवणुकीचा सेम प्लॅन अंमलात आणायचा. चक्रवाढ दराने आपली किमया दाखवली. जी रक्कम जमा व्हायला सुरुवातीला ५ वर्षे लागले तितकीच अधिक रक्कम पुढच्या ३-४ वर्षातच जमा झाली. आणि मग घातांक दराने विचार करता यायला लागला.

    हजारो कोटींचे मालक असलेले गुंतवणूकदार साध्या किंवा भाड्याच्या घरात का राहत असावेत याचा अंदाज आला.

    हे सगळे लिहिले आहे तितके सरळ, सोपे आहे का? नक्कीच नाही. गुंतवणूकदार बनतांना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते तर ती असते आपली विचार प्रवृत्ती. तुमचे गणित कच्चे असले तरी चालेल. पण तुमच्याकडे जोखीम घेण्याची हिंमत, अमर्याद संयम, भावनांवर नियंत्रण, वाट पाहण्याची क्षमता, आणि आपल्या प्लॅनला तडीस नेण्याची प्रबळ इच्छाशक्ती हवी असते. याचबरोबर कुणाशीही तुलना न करता, जग काय म्हणेल असा विचार न करता जगता आले पाहिजे. तुम्ही कितीही जिनियस असा पण तुमच्या मनावर तुमचे नियंत्रण नसेल तर असे कठीण प्लॅन तडीस नेणे फार कठीण आहे.

    ही गुंतवणूक अशीच वाढू द्यायची का? तिचा उपभोग कधी घ्यायचा? कसा घ्यायचा? गुंतवणुकीतून निर्माण झालेल्या संपत्तीतून काय विकत घेता येऊ शकते? या प्रश्नाची उत्तरे लवकरच वेगळ्या लेखातून देईलच. तोपर्यंत तुम्ही चक्रवाढ दराने होणाऱ्या वाढीला समजून घ्या. त्याचे Calculators वापरून त्यांच्याशी खेळा.

  • तात्पुरते मोह टाळा

    chess piece
    Photo by Pixabay on Pexels.com

    गुंतवणुकीविषयीच्या चर्चेत बऱ्याच वेळा असा तर्क केला जातो की भविष्याची चिंता करून आज तडजोडी का कराव्यात?  मिळाले ते पैसे खर्च करून मजेत आयुष्य का जगू नये? भविष्य कोणी पाहिले? 

    खरंतर या  तर्काला काही ठोस उत्तर नाहीये.  ही शेवटी प्रत्येकाची वैयक्तिक चॉईस आहे. तरीही सुखी भविष्यासाठी प्लॅन करायचा असेल तर त्यासाठी चालू वर्तमानात काही निर्णय घ्यावेच लागतील.  आजचे काही मोहाचे क्षण टाळून  भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील.  याच संदर्भातील एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय प्रयोग समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

    १९६० साली स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये एक प्रयोग करण्यात आला. चार वर्षांच्या मुलांसमोर थोडी मिठाई ठेवण्यात आली.  आणि त्यांना सांगण्यात आले की ही मिठाई आता लगेच खाता येईल किंवा अजून पंधरा मिनिटे थांबले तर त्यांना अजून जास्त मिठाई देण्यात येईल. आणि त्या मुलांना रूममध्ये एकटे सोडण्यात आले.  पंधरा मिनिटांच्या आत  कोणी मिठाई खाल्ली किंवा न खाता नंतर मिळणाऱ्या मोठ्या बक्षिसासाठी वाट पाहिली याचा डेटा बनवण्यात आला. या मुलांवर कित्येक वर्षांपर्यंत नजर ठेवण्यात आली. हा प्रयोग कित्येक वर्षे चालला.  जी मुलं पंधरा मिनिटे वाट बघू शकली आणि अधिक मोठे बक्षीस घेऊ शकली ती मुलं नंतरच्या आयुष्यात, शिक्षणात, समाजाबरोबरच्या नात्यात, भावनिक दृष्ट्या अधिक सफल होत गेली.  ज्यांना मिठाई लगेच खाण्याचा मोह आवरला नाही त्यातल्या बऱ्याच मुलांना नंतरच्या आयुष्यात खडतर दिवसांना सामोरे जावे लागले, अपयश भोगावे लागले. 

    या प्रयोगाला मार्शम्यॅलो टेस्ट म्हणून ओळखले जाते. नंतर अशाच प्रकारचे अनेक प्रयोग करण्यात आले त्यांचे निष्कर्ष ही काही वेगळे नव्हते. 

    आजच्या दिवशी काही मोहाचे क्षण टाळून भविष्यातल्या मोठ्या प्रॉब्लेम पासून स्वतःला वाचवता येऊ शकते. आज काही छोट्या तडजोडी केल्या तर भविष्यातील मोठे संघर्ष टाळता येतील हा या प्रयोगामागचा मुख्य संदेश आहे. यालाच Delayed Gratification असेही म्हणतात. आणि Instant Gratification ही त्याच्याविरुद्धची संज्ञा आहे.

    Delayed Gratification  ची अनेक उदाहरणे सांगता येतील. जसे शालेय अवस्थेत असताना कोणीतरी टीव्ही बघण्याचा,  व्हिडिओ गेम खेळण्याचा मोह टाळून तो वेळ अभ्यासासाठी वापरतो  आणि मग भविष्यात त्याला अनेक पटींनी त्या Delayed Gratification ची फळे मिळतात. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. 

    भविष्य कितीही अनिश्चित असले तरी आपल्या परीने त्याचे प्लॅनिंग नक्कीच करता येईल.

    आपण आज ज्या झाडाचे फळे चाखतो ते झाड एका रात्रीत वाढत नाही. एक तर पंधरा-वीस वर्षांपूर्वी आपण किंवा आपल्या आधी इतर कोणीतरी ते लावलेले असते.  की ते चांगल्या गोष्टींची फळे मिळण्यास भरपूर काळ द्यावा लागतो.  आणि तितका संयम बाळगल्यास ती फळे कैक पटीने मिळू शकतात. 

    हे गुंतवणुकीविषयी फार जास्त समर्पक आहे. का?

    १. आपले उत्पन्न अमर्याद नाही ते कधीही थांबू शकते. 

    २. सततच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मागच्या काही दशकांपासून आपले आयुष्यमान वाढलेले आहे,  त्यामुळे रिटायरमेंट नंतर सुद्धा काही दशके आपण जिवंत राहू शकतो पण त्या काळात आपले उत्पन्न चालूच राहील याची शाश्वती नाही.  अगदी साठव्या वर्षापर्यंत जरी काम केले तरी पुढची एक दोन दशके उत्पन्न शिवाय जाऊ शकतात त्यासाठीची तरतूद महत्त्वाची आहे. 

    ३.  इन्फ्लेशन म्हणजेच महागाई तुमच्या कमाईला खात राहणार आहे.  एक दोन पिढ्यात तुमच्या पैशांचे कैक पटीने अवमूल्यन होऊ शकते.  त्या पैशांना योग्यरीत्या गुंतवलेले नसेल तर इन्फ्लेशन तुम्हाला गरिबीत ढकलू शकते. 

    सरकार चित्रपटात एक डायलॉग आहे तो मला फार आवडतो: “नजदिकी फायदा देखने से पहले; दूर का नुकसान सोचना चाहिए.”

  • वाढत्या पगाराबरोबर तुमचे  राहणीमान अधिक खर्चिक होऊ देऊ नका

    Background Lifestyle” by Chatree Petjan/ CC0 1.0

    माझी पहिली नोकरी पुणे विद्यापीठात होती. विद्यापीठाच्या मागे खडकीत एका स्वस्त हॉस्टेल मध्ये मी १००० रुपये महिना भाडे देऊन राहत असे. विद्यापीठात चालत जात असे. एक वर्ष काम केल्यावर आयटी मध्ये चांगली नोकरी मिळाली म्हणून विद्यापीठ सोडले. जातांना माझे विद्यापीठातील बॉस डॉ. जयंत कीर्तने यांनी एक सल्ला दिला. ते म्हणाले, तुझा पगार तिथे दरवर्षी वाढत जाईल. फक्त त्या वाढत्या पगाराबरोबर तुझे राहणीमान अधिक खर्चिक होऊ देऊ नकोस, मी काय म्हणतोय हे तुला काही वर्षानंतर कळेल. आणि तु माझे आभार मानशील. त्यांच्या शब्दात, “Just don’t upgrade your lifestyle with rising income, you’ll thank me later”.  नंतर अर्थातच मी तो सल्ला शब्दशः पाळला. आणि सरांचे पुनःपुन्हा आभारही मानले.

    Parkinson’s Law नावाचा एक नियम आहे. तो नियम सांगतो, आपले खर्च हे आपल्या उत्पनाच्या पटीत वाढत जातात. लोकांचे उत्पन्न कितीही वाढले तरी त्याच पटीत ते खर्च वाढवत नेतात. त्यांचा पहिला पगार फार छोटा असतो, त्यातही ते मस्त जगत असतात. काही वर्षानंतर पगार कैक पटींनी वाढतो. आणि मग तोही पुरेनासा होत जातो. मग त्या पगारातून बचत करणे, गुंतवणूक करणे फार दूरची गोष्ट असते. ज्यांना Parkinson’s Law ला हरवता येतं, ते लवकरच एक विलक्षण स्वातंत्र्य उपभोगायला लागतात.

    महिना ५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या काही लोकांचेही महिना अखेरीला बचत खाते रिकामे झालेले पाहिलेले आहे. आणि महिना ५० हजार कमावणारेही १०-१५ हजारांची मासिक बचत करतांना पहिले आहेत.

    मी शेअर्स गुंतवणुकीच्या निमित्ताने कंपन्यांचे वार्षिक अहवाल (Annual Report) वाचत असतो. माझ्या वाचनातून एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली, कार, कपडे, चपला-बूट, मोबाईल, दुचाकी या प्रकारच्या वस्तू ज्या काही वर्षानंतर जुन्या होतात त्यांना ग्राहकाने लवकर बदलावे किंवा अपग्रेड करावे यासाठी सुद्धा या कंपन्यांच्या मार्केटिंग आणि सेल्स टीम्स काम करत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर पायात घालायचे शुज हे पूर्वी सरासरी १२ ते १८ महिने वापरले जायचे आणि मग ते बदलले जायचे. आता तो काळ ८ महिन्यांवर आला आहे. 

    मोबाइल कितीही लेटेस्ट घेतला तरी पाच सहा महिन्यात त्याचे दुसरे मॉडेल बाजारात अवतरते आणि तुमचा मोबाइल जुना होऊन जातो. तुम्ही एकदम लेटेस्ट मॉडेलची कार घेता, वर्षाच्या आत त्याच कार चे नवे मॉडेल येते, आणि तुमची कार जुनी वाटू लागते. मग तुम्ही नेक्स्ट अपग्रेड प्लॅन करत राहता. पुढची पगारवाढ, पुढचा बोनस त्यासाठी वापरला जातो.

    औद्योगिक क्रांतीने सामान्यांच्या हाती पैसे खेळवले, पण तेच पैसे परत महिन्याच्या महिन्याला श्रीमंतांकडे परत कसे जात राहतील याचीही सोय केली. सामान्यांचे पगार वाढले, मग त्यांच्या घरांचा आकार वाढला, मग कारचा आकार वाढला, मग लाख-दोन लाख किमतीचे फोन दर तीन वर्षांनी बदलण्याची गरज निर्माण झाली, घरातले फर्निचर दर ४-५ वर्षांनी बदलण्याची गरज निर्माण झाली, एका शूज च्या जागी अनेक जोड आले, वॉर्डरोब कपड्यांनी भरले. यादी फार मोठी आहे.

    या दुष्ट चक्रातून स्वतःची सुटका करण्यासाठी मुक्त विचार हवे आहेत. आपल्या खांद्यावर आपलेच डोके हवे आहे. मार्केट, सोशल मीडिया, तुमचे सोशल सर्कल तुम्हाला नेहमी पळायला लावत राहील. तुम्ही ठरवायचे आहे. किती पळायचे. आणि हे पळणेही गोल रिंगणात पळणे आहे. शेवटी तुम्ही होता तिथेच पोहोचणार आहात.

    शाश्वत संपत्तीनिर्मितीसाठी आवश्यक असलेली पहिली गोष्ट ही की, तुमची जीवनशैली कशी अपग्रेड करायची याचे तारतम्य असणे. तुमची जीवनशैली खूप वेगाने अपग्रेड करू नका. जे लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा खूप साधे आयुष्य जगू शकतात ते अशा स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतात जे त्यांची जीवनशैली सुधारण्यात व्यस्त आहेत हे समजूच शकत नाही.

    फक्त एवढेच करा, एकदा का तुमच्याकडे सर्व बेसिक गरजा पूर्ण करण्यापुरते पैसे आले, आणि त्यानंतर जेव्हा तुमचे उत्पन्न वाढत गेले तरीही तुम्ही तुमच्या जगण्यात बदल न करता आधीसारखे जगायचे आहे, अतिरिक्त उत्पन्न मिळते आहे म्हणून लगेच घर, जीवनशैली आणि स्टेटस सिम्बॉल दाखवणाऱ्या त्या सर्व इतर गोष्टी अपग्रेड करण्याची घाई करू नका. कुठेतरी थांबा.

    समजा आज तुम्हाला महिन्याला १ लाख पगार मिळवत आहात. गोष्ट अशी आहे की, जेव्हा तुम्ही अशा उत्पन्नावर पोहोचता, तेव्हा तुम्ही सहसा छोट्या उत्पन्नापासून सुरुवात करता, जसे २५ हजार रुपये महिना आणि मग हळू हळू ते उपन्न वाढत जाते. ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. हे घडत असताना, एक प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही जसे अधिकाधिक पैसे कमावत जाता तसे तुम्ही तुमची जीवनशैली अपग्रेड करत जाता. आणि त्या अपग्रेडिंगलाच तुम्ही संपत्ती समजता आणि हळुवारपणे तुम्ही या चंगळवादी सापळ्यात फसत राहता.

    नसीम तालेब म्हणतात, “सर्वात धोकादायक गोष्टी म्हणजे हेरॉईन आणि मासिक पगार.” बरोबर, कारण या गोष्टी खूप व्यसनशील आहेत. थोडक्यात सांगायचे तर संपन्नतेकडे जाण्याचा सुयोग्य मार्ग कुठला तर आधी गरीब बनून जगता येणे. वाढत्या उत्पन्नाबरोबर आपला खर्च  वाढवत नेऊन त्या आर्थिक गुलामगिरीत न फसणे. 

  • Results or Hardwork?

    Workers in a Machine Tool Shop (oil painting)
    Workers in a Machine Tool Shop (oil painting) by Douglas Pittuck is licensed under CC-BY-NC-SA 4.0

    मागे एकदा एका इंटरेस्टिंग व्यक्तीला भेटलो. ते अमेरिकेत शिकले होते आणि शिक्षण चालू असताना कमाई म्हणून ते कीमेकर (नकली चावी बनवणारा) चे काम करायचे. त्यांनी काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या.
    बऱ्याच वेळा लोक चावी विसरल्यामुळे आपल्या घराच्या बाहेर अडकायचे. असे घडल्यावर बरेच लोक तणावात जातात. मग जेव्हा कीमेकर ला पाचारण केल्यावर तो अवतरतो तेव्हा देवदूत अवतरल्यासारखे भासते. हा की मेकर जेव्हा नवखा होता तेव्हा सहजासहजी कुलूप उघडत नसे. त्याला बराच वेळ लागायचा. हे सगळे करत असताना त्याला बरेच कष्ट घ्यावे लागत. खूप वेळा उठ बस करावी लागे. कधी घामाने अंग ओले होऊन जाई. बराच वेळ खटपट केल्यावर शेवटी कुलूप उघडले जाई आणि मग सर्व कुटुंबीय आपल्याच घरात जाऊ शकत. त्यांना एक वेगळा आनंद होत असे. आणि मग की मेकर ला तो मागेल तितके पैसे ते आनंदाने देत असत.
    कालांतराने हा कीमेकर आपल्या कामात एक्सपर्ट होऊ लागला. कुलूप उघडायला त्याला कमी वेळ लागू लागला. फार कष्ट पडत नसत. काही दिवसांनी तर तो काही मिनिटातच कुलूप उघडू लागला. त्याचा कामाचा वेग वाढला. तो सहजासहजी कुलूप उघडतो आहे, हे बघून बऱ्याच वेळा लोक त्याला पैसे देताना खळखळ करायचे. ते म्हणायचे की दोन तीन मिनिटांचं तर काम होतं त्यात इतके पैसे का मागताय? त्याने सहज कुलूप उघडले, कमी वेळ घेतला यामुळे त्याच्या श्रमाचे मूल्य लोकांच्या दृष्टीने कमी होऊ लागले.
    हा की मेकर हुशार होता, त्याला ही गोष्ट कळली. मग नंतर तो जाणून बुजून हे काम पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ घेऊ लागला. दोन मिनिटात होऊ शकणारे काम वीस तीस मिनिटे रखडून ठेवू लागला. मी खूप कष्ट करतो आहे असे भासवू लागला. तसे केल्यावर त्याचे पैसे देताना खळखळ करणारे ग्राहक कमी होऊ लागले. या अनुभवातून त्याला ही जाणीव झाली की बऱ्याच वेळा किती महत्त्वाचे काम पूर्ण केले यापेक्षा ते काम करताना किती कष्ट केले यावर लोक जास्त इम्प्रेस होतात. स्मार्ट वर्क जरी हार्ड वर्क पेक्षा भारी असले तरी हे लक्षात घ्यावे लागेल की वैयक्तिक निकाल मिळवण्यासाठी स्मार्टवर्क गरजेचे आहे. इतरांसमोर भासवण्यासाठी हार्डवर्क केल्याचे नाटक करावे लागेल.
    हा किस्सा इथे संपत नाही, ती व्यक्ती फायनान्स वर्ल्ड मध्ये उच्च पदावर काम करते आहे. आणि ते सांगत होते की, फायनान्स आणि कित्येक क्षेत्रात ही फिलॉसॉफी लागू पडते. बरेच लोक हार्डवर्क केल्याचे भासवतात. स्टॉक मार्केट पोर्टफोलिओ मॅनेजर कडे पोर्टफोलिओ चे नमुने तयार असतात, ते जसेच्या तसे लोकांना विकले जातात. पण त्यापूर्वी असे भासवले जाते की पोर्टफोलिओ मॅनेजर खूप मोठा रिसर्च करतो आहे, कस्टमरचा रिस्क प्रोफाइल जाणून घेऊन त्याच्यासाठी सूटेबल पोर्टफोलिओ बनवतो आहे. हे कष्ट भासवण्यासाठी, कस्टमरची वेगवेगळी माहिती मागितली जाते. हे काम गरज नसताना रखडले जाते, आम्ही अजूनही काम करतो आहोत असे पुन्हा पुन्हा सांगितले जाते. मुद्दाम डेडलाईन चुकवली जाते. आणि मग खूप कष्टाने त्या कस्टमरचा पोर्टफोलिओ बनवला आहे असे भासवले जाते. थोड्याफार फरकाने हीच बाब अनेक क्षेत्रात लागू पडते. कित्येक डॉक्टर्स पेशंटला मोठे मोठे फॉर्म भरायला सांगतात. त्यांची सगळी मेडिकल हिस्टरी जाणून घेण्याच्या नावाखाली पेशंटला इम्प्रेस करतात आणि मग रुटीन ट्रीटमेंट कडे वळतात. या प्रक्रियेतून किती प्रामाणिकपणे पेशंटची हिस्टरी वापरून ट्रीटमेंट प्लॅन बनवला यापेक्षा पेशंटला फार मोठे समाधान लाभते. हे सरसकट प्रत्येक व्यवसायिक करतो असे म्हणणे म्हणजे प्रामाणिक व्यावसायिकांवर अन्याय ठरेल. पण तरीही ही प्रॅक्टिस खूप जन करतात.

    आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये किती काम केले यापेक्षा तुमच्या कामाने किती व्हॅल्यू ॲड केली हे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात तासांपेक्षा तुम्ही किती महत्त्वाचा प्रॉब्लेम सोडवला हे महत्त्वाचे आहे. तुम्ही ज्याच्यासाठी काम करता म्हणजे तुमचा एम्प्लॉयर किंवा तुमचा कस्टमर त्याचा तुम्ही किती महत्त्वाचा प्रॉब्लेम सोडवला आणि त्यातून त्याला किती लाभ झाला यावर तुम्हाला मिळणारा मोबदला ठरावा लागतो. पण सगळीकडे असे होत नाही. बरेच लोक पैसे देताना समोरच्याला किती कष्ट पडले हे आधी बघतात. मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. मी जेव्हा एखादी सेवा पुरवतो तेव्हा ते करताना मला किती वेळ लागला यापेक्षा मी माझ्या ग्राहकाचा किती वेळ, पैसा वाचवला आणि त्याचे आयुष्य किती सोपे केले हे महत्त्वाचे.
    तसेही आज-काल, प्रत्यक्षात रिझल्ट देणाऱ्या राजकारण्यांपेक्षा, मी अठरा अठरा तास काम करतो असे भसवणारे राजकारणी जास्त प्रसिद्ध आहेत.

  • Lapis Lazuli and the medieval world

    Lapis Lazuli and the medieval world

    नेटफ्लिक्स वर Vikings ही वेब सिरीज बघत होतो. Vikings हे मुख्यत्वे मध्ययुगीन Scandinavia मधील Norsemen लोकांच्यावर आधारलेली ऐतिहासिक वेब सिरीज आहे.

    virgin mary and jesus christ photo
    Photo by Mario Papich on Pexels.com

    त्यात वेस्सेक्स इंग्लंड ची राणी ज्युडिथ ही वर्जिन मेरीचे चित्र काढत असते. त्या चित्रातील मेरीच्या कपड्यांचा पदर सुंदर निळ्या रंगाने रंगवत असते. तो निळा रंग बनवण्यासाठी राणी एक निळा स्फटिक रगडून त्याची भुकटी बनवते आणि त्यात पाणी मिसळून रंग बनवते. तितक्यात तिची सून तिला विचारते की हा निळा स्फटिक काय आणि कुठला आहे. राणी उत्तर देते: “याला Lapis lazuli म्हणतात, आणि हा रंग फार दुरून कुठून तरी आणला आहे.” Lapis lazuli हे नाव ऐकताच माझे मन भूतकाळातील आठवणीत फ्लॅशबॅक मध्ये गेले. २०१९ मध्ये अजिंठ्याच्या लेण्या पाहण्यासाठी गेलो होतो. तिथे जाण्यापूर्वी लेण्या विषयी लेण्यांविषयी थोडा अभ्यास करून गेलो होतो. तेव्हा हा शब्द वाचनात आला होता.  सातव्या शतकात इंग्लंडची ज्युडिथ राणी मदर मेरी चे चित्र रंगवण्यासाठी वापरत असलेला निळा रंग त्याच काळात अजिंठ्याच्या लेण्यांमध्येही वापरला जात होता.  अजिंठ्यातील कित्येक स्त्रियांचे कपडे याच रंगाने रंगवलेले आहेत.  या रंगाविषयी थोडेसे. 

    Ajanta Paintings.

    Lapis lazuli हा दगड  सध्याच्या अफगणिस्तान आणि इराणच्या काही भागात नैसर्गिकरित्या सापडतो. . या रंगाच्या सुंदर आणि विशिष्ट निळ्या रंगाच्या छटेमुळे या रंगाला मध्ययुगीन काळात जगभर मागणी होती.  जवळजवळ दीड हजार वर्षांनंतरही अजिंठ्याच्या लेण्यांसह जगात इतर अनेक ठिकाणी या रंगाने रंगवलेले चित्र अजूनही शाबूत आहेत. भारतात या दगडाला राजवर्त हे नाव होते. या दगडांचे खडे मध्ययुगीन भारतीय राजे आणि श्रीमंत लोक दागिन्यांमध्ये आणि अंगठ्यांमध्ये वापरत. जसजसा सिल्क रोड मार्गे भारतीय उपखंड आणि युरोपमधील व्यापार वाढू लागला तसा या दगडाने युरोपमध्ये प्रवेश केला. हा रंग युरोपात पोहोचला आणि युरोपियन कलाकारांनी याला Ultramarine असे नाव दिले.  Ultramarine म्हणजे सागराच्या निळाईपेक्षाही निळा. 

    हा दगड आणि त्याच्यापासून बनलेल्या रंगाला सोन्यापेक्षाही अधिक किंमत मिळत असे. युरोपमधील श्रीमंत रेनेसॉ चित्रकार  या रंगाचा वापर करत.  लिओनार्डो डा विंची च्या चित्रांमध्येही या रंगाचा वापर झालेला आहे.  इजिप्त मधील प्रसिद्ध Tutankhamun च्या मुखवट्यामध्ये हा रंग वापरलेला आहे.  अतिसुंदर राणी कलियोपात्रा या रंगाचा वापर आय शेड म्हणून वापरत असे म्हणतात. इतकेच काय अति प्राचीन सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा या रंगाचा वापर झालेला दिसतो. 

  • शाश्वत-कालातीत

    अमेझॉन चे जेफ बेझोस यांना विचारले होते की भविष्यात काय बदल होतील, तंत्रज्ञान कुठल्या मीडिया जात आहे, नवव्यवसायिकांनी भविष्याकडे कसे लक्ष द्यावे? त्यांनी फार सुंदर उत्तर दिले होते. ते म्हणतात, भविष्यात काय बदलेल यावर लक्ष देण्यापेक्षा काय बदलणार नाही हे लक्षात घेणे अधिक सुलभ आणि महत्त्वाचे आहे. ३० वर्षांपूर्वी जेव्हा अमेझॉन सुरू केली होती तेव्हा लोकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात आणि घरपोच हव्या होत्या. आजही लोकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात आणि घरपोच हव्या आहेत, आणि माझ्या मते भविष्यातही लोकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात आणि घरपोच हव्या असतील. ॲमेझॉन ची आयडिया शाश्वत आणि कालातीत आहे. त्या आयडियाची अंमलबजावणी करण्यासाठीचे तंत्रज्ञान कदाचित बदलत जाईल. पण मूळ आयडिया कालातीत आहे.
    प्रसिद्ध गणितज्ञ आणि विचारवंत नसीम निकोलस तलेब यांनी लिंडी इफेक्ट नावाचा एक सुंदर सिद्धांत मांडला आहे. ते म्हणतात एखादी आयडिया जितक्या मोठ्या काळापासून रूढ आहे, तर भविष्यातही तितक्याच किंवा त्याहूनही अधिकारासाठी ती आयडिया रूढीत राहीलच. हे तत्त्वज्ञान आपल्या आयुष्यात खूप गोष्टींना लागू पडते. तुम्हाला कुठली पुस्तकं वाचायची आहेत हे ठरवताना लिंडी इफेक्ट गृहीत धरून पुस्तकांची निवड करता येऊ शकते. जी पुस्तक कालातीत आहेत ती सर्वप्रथम वाचा. उदाहरणार्थ, सिद्धार्थ हे पुस्तक जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी प्रकाशित झाले. हे पुस्तक आजही तितकेच समर्पक आहे आणि माझ्या मते अजून हजार वर्षांनी ही या पुस्तकातील संदेशाशी त्याचे वाचक समर्पकता शोधू शकतील. गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान २६०० वर्षे जुने आहे, आजही त्याची समर्पकता तितकीच टिकून आहे. जेव्हा आपण असे कालातीतत ज्ञान शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खरंतर आपण आपला वेळच वाचवत असतो.
    मी आज जे काही शिकतो आहे ते माझ्या आयुष्यात अजून किती काळ लागू पडणार आहे त्यानुसार जर मी माझा प्राधान्यक्रम ठरवला तर माझी ज्ञानसाधना शाश्वत रूप घेऊ लागते.
    लॉन्ग टर्म इन्वेस्टिंग मध्ये असा विचार केल्याने खूप फायदा देऊ शकणारे पोर्टफोलिओ उभे करता येऊ शकतात.
    हीच गोष्ट आयुष्यात बऱ्याच बाबींमध्ये मदत करू शकते. तत्पूर्वी लॉंग टर्म विचार करायला शिकणे आवश्यक आहे.

  • आर्थिक नियोजन म्हणजेच सेल्फ डिफेन्स

    strong ethnic fighter showing punching technique during training
    Photo by Julia Larson on Pexels.com

    मध्ययुगात किंबहुना ५०-६० वर्षांपूर्वी सुद्धा स्वसंरक्षण म्हणजेच सेल्फ डिफेन्स हे जीवनावश्यक कौशल्य होते. ते नसेल तर कुणाचेही बाराच्या भावात मरण होत असे. आज काळ बदलला आहे.
    जीवनावश्यक म्हणून कौशल्यांची यादी करायची झालीच तर, आर्थिक नियोजन हे कौशल्य यादीत फार वरती यायला हवे. आपल्या पैशांना वाचवायला, वाढवायला आणि त्यांचे रक्षण करायला शिकणे फार महत्त्वाचे आहे.
    आधी तलवार आणि परशू घेऊन डाकू तुम्हाला लुटायचे आज पांढऱ्या कॉलरचे कपडे घालून आणि टाय लावलेले व्हाईट कॉलर डाकू तुम्हाला लुटताहेत. पूर्वीचे गुलाम साखळदंडात बांधलेले असायचे आजचे गुलाम क्रेडिट कार्डात, कर्जाच्या हफ्त्यात आणि टिविवर-सिनेमांत दाखवलेल्या आभासी चमकत्या जगाचे प्रलोभन दाखवून बांधून ठेवलेत.
    ३१ तारखेला टॉप अप झालेले बँक अकाउंट पुढच्या महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत रिकामे होत असेल तर आर्थिक नियोजन नावाचे जीवनावश्यक कौशल्य शिकून घ्यायची तुम्हाला गरज आहे.

    उत्पन्न अमर्याद नाही.
    खर्च सरणावर जाईपर्यंत आहे.

  • Best Books On Investing.

    बऱ्याच वेळा मला गुंतवणुकीविषयीच्या पुस्तकांसाठी सल्ला विचारला जातो म्हणून मला महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही पुस्तकांविषयी इथे लिहीत आहे.

    आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुंतवणुकीला सुरुवात करायची असते. गुंतवणुकीविषयी अधिक समजून घ्यायचे असते. त्याविषयीच्या तांत्रिक, मानसिक बाजू समजून घ्यायच्या असतात. पण कुठून सुरुवात करायची ते समजत नाही. साहजिक आपण पुस्तकांकडे वळतो. तेव्हाही योग्य वळणावर योग्य पुस्तक हातात आले नाही तर गोंधळायला होते.

    माझ्या स्वानुभवावरून काही पुस्तकांची यादी येथे क्रमाने देत आहे.

    आशा आहे की ही यादी काही जणांना उपयुक्त ठरेल.

    १. The psychology of money

    https://amzn.to/3URWasw

    मराठी अनुवाद: https://amzn.to/3Uu0tdO

    हे पुस्तक इतके महत्त्वाचे आहे की मला वाटते ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. मी स्वतः या पुस्तकाला सर्व फॉरमॅटमध्ये विकत घेतले. पुस्तक, ई बुक, ऑडिओ बुक. 

    पैशांविषयी समजून घेताना तुमचे तांत्रिक ज्ञानापेक्षा तुमची पैशांविषयीची मानसिकता फार महत्त्वाची असते. बराच वेळा लोकांकडे शेअर मार्केट, गुंतवणूक याविषयीचे सखोल तांत्रिक ज्ञान असते पण त्याविषयी हवी असणारी मानसिकता याबाबतीत ते फार कच्चे असतात. आर्थिक स्वातंत्र्य कशासाठी मिळवायचे? खर्च कसे करायचे? ENOUGH म्हणजे पुरेशी संपत्ती म्हणजे काय? श्रीमंत आणि अर्थ स्वातंत्र्य मधला फरक म्हणजे काय? पैशांनी वस्तू खरेदी करायच्या की वेळ? पैशांनी स्वातंत्र्य कसे कमवायचे? पैसा इतरांना इम्प्रेस करण्यासाठी कमवायचा की स्वतःला स्वातंत्र्य करण्यासाठी? 

    थोडक्यात पैशांविषयीचे बेसिक्स हे पुस्तक क्लिअर करते. फार थोड्या शब्दात खूप काही सांगून जाते. पुन्हा पुन्हा वाचावे आणि प्रत्येक वेळी नवे संदर्भ उलगडत जावे असे हे पुस्तक आहे.

    २. The Almanack of Naval Ravikant. https://amzn.to/3F0yn4X

    मराठी भाषांतर: https://amzn.to/3DkhHEp

    या पुस्तकात खूप महत्वाच्या गोष्टी सोप्या करून मांडल्या आहे. संपत्तीनिर्मिती विषयी जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. पैसा आणि संपत्ती मधला फरक. संपत्ती निर्मितीचे शाश्वत मार्ग. संपत्ती नेमकी कशासाठी कमवायची? संपत्तीनिर्मीतीतून वेळ कशी कमवायची? आयुष्य अधिक अर्थपूर्ण कसे होऊ शकेल अशा कित्येक महत्वाच्या मुद्द्यांवर सुंदर विवेचन आहे. नवल रविकांत हे अमेरिकेत एक यशस्वी उद्योजक व गुंतवणूकदार आहेत. सिलिकॉन व्हॅली मधल्या काही महत्वाच्या विचारवंतांमध्ये त्यांना मोजले जाते. नवल रवीकांत यांनी दिलेल्या विविध मुलाखती, त्यांचे ब्लॉग, ट्विटर वरील लिखाण या सगळ्यांचे संपादन करून हे पुस्तक बनलेले आहे. संपत्ती निर्मिती व्यतिरिक्त इतरही काही महत्त्वाच्या विषयांवर सुंदर भाष्य या पुस्तकात आहेत.

    ३. From the Rat Race to Financial Freedom.

    https://amzn.to/3CSnrUl

    अर्थ-स्वातंत्र्य हा मागच्या काही वर्षांपासून बहुचर्चित विषय आहे. पश्चिमेकडे FIRE म्हणजेच financially independent retired early नावाची एक मोहिमच सुरू आहे. यात योग्य आर्थिक नियोजन करून, गुंतवणूक करून लवकर रिटायर होतात. आणि उरलेले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे, आपले छंद जोपासत जगतात. यातला freedom म्हणजेच स्वातंत्र्य हा भाग थोडा spiritual म्हणजेच अध्यात्मिक (धर्मविरहित) आहे. हे अध्यात्मिक स्वातंत्र्य उपभोगतांना आपल्यावर भणांगासारखे राहायची वेळ येऊ नये यासाठी आधी आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा अगदी आपल्या मनासारखे आयुष्य जगता यावे यासाठीही लवकर फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी बरेच जण प्रयत्न करतात.

    हे पुस्तक याच विषयाला अनुसरून आहे. पुस्तक एका भारतीयाने लिहीलेले आहे. या पुस्तकात सर्व तांत्रिक बाबीही सोप्या करून सांगितलेल्या आहेत. लेखक स्वतः योग्य आर्थिक नियोजन करून चाळिशीत रिटायर झालेले आहेत. आता वृक्ष लागवडीसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी पूर्णवेळ काम करत आहेत. 

    ४. The Intelligent Investor

    https://amzn.to/3tr0Dqo

    हे पुस्तक गुंतवणुकीसाठी चे बायबल मानले जाते. पुस्तक फार जुने आहे. वॉरन बफेट यांच्या गुंतवणुकीच्या पद्धतीवर पुस्तकाचे लेखक बेंजामिन ग्राहम यांचा मोठा प्रभाव होता. पुस्तकाचा बराचसा भाग तांत्रिक आहे. प्रत्येक धड्यानंतर तो सोप्या भाषेत समजावून सांगितलेला आहे. आता त्या commentaries वाचुन होतात फक्त. 

    जर तुम्हाला पुस्तक समजायला अवघड वाटत असेल तर ८ व्या आणि १२ व्या प्रकरणांची कमेंटरी तरी वाचा. हे दोन प्रकरण खूप महत्त्वाचे आहेत.

    ५. Coffee can investing

    https://amzn.to/3Ty74Tj

    भारतीय लोक जेव्हा गुंतवणुकीसाठी चे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मुख्यत्वे त्यांच्या हातात अमेरिकन पुस्तक जास्त येतात. आधीच्या पॉईंट मध्ये उल्लेख केलेले द इंटेलिजंट इन्वेस्टर हे पुस्तक तर हमखास हातात पडते. तरीही भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय उद्योग आणि इथले भांडवली बाजार याविषयी समजून घेण्यासाठी अमेरिकन संदर्भ उपयुक्त ठरत नाहीत. कॉफी कॅन इन्वेस्टिंग सारखे पुस्तक इथे कामी येते. पुस्तकाचे लेखक सौरभ मुखर्जी हे २००५-१० च्या आसपास झालेल्या रिव्हर्स ब्रेन ड्रेनच्या काळात भारतात लंडनहून परत आले. खूप थोड्या काळात त्यांनी भांडवली बाजाराविषयी विलक्षण ज्ञान कमावले. त्यांनी लिहिलेली पुस्तके भारतीय संदर्भामध्ये खूप महत्त्वाची आहेत. कॉफी कॅन इन्वेस्टिंग हा एक गुंतवणुकीचा विलक्षण प्रकार आहे. मी स्वतः मागील सात आठ वर्षांपासून त्याचा अनुभव घेतो आहे. माझ्यासाठी तरी हे पुस्तक आणि याच्या आधी आलेले The Unusual Billionaires https://amzn.to/3fXpX4p हे पुस्तक खूप महत्त्वाचे ठरले आहेत. 

  • Man in the car paradox

    जेव्हा आपण एखादी छान कार पाहतो तेव्हा आपण क्वचितच विचार करतो, “व्वा, ती गाडी चालवणारा माणूस काय मस्त आहे.” त्याऐवजी, आपण विचार करतो, “व्वा, माझ्याकडे ती कार असती तर लोकांना वाटेल की मी किती मोठा माणूस आहे.” कळत-नकळत सगळेच लोक असा विचार करतात. 

    इथेच मानवी विचारात एक विरोधाभास आहे: लोकांना संपत्ती हवी आहे, फक्त यासाठी जेणेकरून इतरेजन त्यांचा आदर करतील, इतरांना ते आवडतील. परंतु संपत्तीच्या प्रदर्शनाने इतरांना तुम्ही कधीच आवडत नसतात. याचा अर्थ असा होत नाही की जग संपत्त्तीचा किंवा तुमचा तिरस्कार करतं. जग तुमच्या वस्तूंना, संपत्तीला मापदंड (benchmark) म्हणून वापरते. म्हणजे काय? 

    जेंव्हा तुम्ही तुमच्या कारचा, महागड्या घड्याळाचा, मोठ्या घराचा, दागिन्यांचा, उंची कपड्यांचा वापर इतरांना प्रभावित करण्यासाठी करता, तेव्हा ते इतर जण तुमचा आदर करण्या ऐवजी तुमच्या भौतिक वस्तूंचा आदर करतात आणि त्या वस्तू त्यांच्याकडे कधी येतील याचाच विचार करतात. तुमच्या महागड्या कारच्या ड्रायविंग सीट वर कोण बसले आहे, इकडे कुणाचेच लक्ष नसते. कार कडे बघणारे ती तशी कार त्यांच्याकडे कधी येईल फक्त याचाच विचार करतात. हेच तुमच्या मोठ्या घराला, दागिन्यांना, आय-फोनला आणि इतर सर्व फॅन्सी वस्तूंना लागू पडते.

    जर आपल्याला वाटत असेल, की महागडी कार, मोठं घर यामुळे आपण जगाच्या आदरास, प्रशंसेस पात्र होऊ. तर तसे कधीच होत नाही. विशेष करून त्या लोकांकडून ज्यांच्या आदराची प्रशंसेची आपण कदर करतो.

  • महागाई तुम्हाला गरिबीकडे लोटते आहे.

    असे म्हणतात,

    “महागाई म्हणजे जेव्हा तुम्ही शंभर रुपयांच्या हेअरकट साठी दीडशे रुपये देतात ज्यासाठी तुम्ही पन्नासच रुपये द्यायचे जेव्हा तुमच्या डोक्यावर केस होते.”

    सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो हे जितके त्रिकालाबाधित सत्य आहे, तितकेच प्रत्येक वस्तूची किंमत वाढत जाणार म्हणजेच महागाई वाढणार हे सुद्धा सत्य आहे.

    महागाईचा विचार करून आपल्या भविष्यचे नियोजन करणे फार महत्वाचे आहे. अन्यथा आपण स्वतःच्या हाताने आर्थिक तणावांना निमंत्रण देऊ शकतो.

    महागाईला उदाहरणासह समजून घेऊ. समजा भारतात सरासरी महागाईचा दर ७% आहे. याचा अर्थ असा होतो की आज ज्या वस्तूची किंमत ₹ १०० आहे ती वस्तू अजून एक वर्षाने १०७ रुपयांची होईल. हे झाले एक वर्षाचे. पण तिथून पुढे काय? तर, पुढे आणखी एका वर्षाने त्या वास्तूच्या किमतीत ७% दराने वाढ झाली तर तिची किंमत १०७ रुपयांच्या ७% म्हणजे १०७ + ७.५ = ₹ ११४.५० होईल. आणि अशाच रीतीने चक्रवाढ दराने म्हणजेच दर साल दर शेकडा (द. सा. द. शे.) दराने वाढत जाईल.

    हे सगळे का महत्वाचे आहे?

    भविष्याचे नियोजन करतांना महागाईत होणारी वाढ गृहीत धरणे फार महत्वाचे आहे. 

    कसे?

    समजा आज तुमच्या कुटुंबाला एक आरामदायी आयुष्य जगण्यासाठी महिन्याला ₹५०,००० लागतात. आज तुमचे वय ४० असेल आणि अजून १५ वर्षांनी तुम्ही निवृत्त होण्याचे नियोजन करत असाल तर असेच आयुष्य जगण्यासाठी अजून १५ वर्षानंतर किती पैसे लागतील याचे गणित करण्यासाठी महागाई गृहीत धरून तुम्ही गणित केले पाहिजे. सरासरी ७% महागाई दर गृहीत धरला तर अजून १५ वर्षानंतर अशीच जीवनशैली जगण्यासाठी अंदाजे ₹ १ लाख ४० हजार महिन्याला लागतील. आणि वीस वर्षानंतर अंदाजे ₹२ लाख लागतील. या गणितात आपण खूप साधे अंदाज करून ७% हा सरकारी आकडा गृहीत धरतो आहोत. खरं म्हणजे प्रत्येकाची महागाई वेगळी असते. जसे, शाळेची फी १०% द. सा. द. शे. दराने वाढू शकते. आरोग्य सेवांचा आणि शिक्षणाच्या किंमतीचा महागाई दर फार जास्त असू शकतो.

    महागाई दारात होणाऱ्या वाढी गृहीत धरूनच निवृत्तीचे नियोजन करावे लागेल. अन्यथा सगळे कर्तबगारीचे आयुष्य सुखवस्तू परिस्थितीत घालवलेल्या कित्येकांना निवृत्तीनंतर गरिबीचे, आर्थिक हलाखीचे जीवन जगतांना पाहिल्याचे कितीतरी उदाहरणं आहेत.

    दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, सरासरी आयुष्यमानात झालेली वाढ. साठीत निवृत्ती घेतली तरी पुढचे वीस-तीस वर्षे आणखी आयुष्य असू शकते. आणि ते आयुष्य उत्पन्नारहित असू शकते. त्या निवृत्ती नंतरच्या आयुष्याचे नियोजन हे महागाई दराला गृहीत धरूनच करावे लागेल.

    महागाईचे आपल्या खिशावर काय परिणाम होतात?

    समजा आज तुमच्याकडे ₹१ लाख आहेत. आणि त्या पैशांची कुठेच गुंतवणूक न करता तुम्ही ते पैसे तसेच ठेवले. तर ७% महागाई दरात एक वर्षानंतर त्या पैशांची किंमत ७ हजार रुपयांनी कमी होईल. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ज्या वस्तू विकत घ्यायला आज तुम्हाला ₹१ लाख रुपये लागतील त्या वस्तू पुढच्या वर्षी ₹१ लाख ७ हजार रुपयांच्या झाल्या असतील.

    महागाईशी कसे लढता येईल? 

    महागाईशी लढण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे आपल्या गुंतवणुकीवर महागाई पेक्षा अधिक दराने परतावा मिळवणे. त्यांचे विविध पर्याय कुठले असू शकतात यावर लवकरच लिहू.