
असे म्हणतात,
“महागाई म्हणजे जेव्हा तुम्ही शंभर रुपयांच्या हेअरकट साठी दीडशे रुपये देतात ज्यासाठी तुम्ही पन्नासच रुपये द्यायचे जेव्हा तुमच्या डोक्यावर केस होते.”
सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो हे जितके त्रिकालाबाधित सत्य आहे, तितकेच प्रत्येक वस्तूची किंमत वाढत जाणार म्हणजेच महागाई वाढणार हे सुद्धा सत्य आहे.
महागाईचा विचार करून आपल्या भविष्यचे नियोजन करणे फार महत्वाचे आहे. अन्यथा आपण स्वतःच्या हाताने आर्थिक तणावांना निमंत्रण देऊ शकतो.
महागाईला उदाहरणासह समजून घेऊ. समजा भारतात सरासरी महागाईचा दर ७% आहे. याचा अर्थ असा होतो की आज ज्या वस्तूची किंमत ₹ १०० आहे ती वस्तू अजून एक वर्षाने १०७ रुपयांची होईल. हे झाले एक वर्षाचे. पण तिथून पुढे काय? तर, पुढे आणखी एका वर्षाने त्या वास्तूच्या किमतीत ७% दराने वाढ झाली तर तिची किंमत १०७ रुपयांच्या ७% म्हणजे १०७ + ७.५ = ₹ ११४.५० होईल. आणि अशाच रीतीने चक्रवाढ दराने म्हणजेच दर साल दर शेकडा (द. सा. द. शे.) दराने वाढत जाईल.
हे सगळे का महत्वाचे आहे?
भविष्याचे नियोजन करतांना महागाईत होणारी वाढ गृहीत धरणे फार महत्वाचे आहे.
कसे?
समजा आज तुमच्या कुटुंबाला एक आरामदायी आयुष्य जगण्यासाठी महिन्याला ₹५०,००० लागतात. आज तुमचे वय ४० असेल आणि अजून १५ वर्षांनी तुम्ही निवृत्त होण्याचे नियोजन करत असाल तर असेच आयुष्य जगण्यासाठी अजून १५ वर्षानंतर किती पैसे लागतील याचे गणित करण्यासाठी महागाई गृहीत धरून तुम्ही गणित केले पाहिजे. सरासरी ७% महागाई दर गृहीत धरला तर अजून १५ वर्षानंतर अशीच जीवनशैली जगण्यासाठी अंदाजे ₹ १ लाख ४० हजार महिन्याला लागतील. आणि वीस वर्षानंतर अंदाजे ₹२ लाख लागतील. या गणितात आपण खूप साधे अंदाज करून ७% हा सरकारी आकडा गृहीत धरतो आहोत. खरं म्हणजे प्रत्येकाची महागाई वेगळी असते. जसे, शाळेची फी १०% द. सा. द. शे. दराने वाढू शकते. आरोग्य सेवांचा आणि शिक्षणाच्या किंमतीचा महागाई दर फार जास्त असू शकतो.
महागाई दारात होणाऱ्या वाढी गृहीत धरूनच निवृत्तीचे नियोजन करावे लागेल. अन्यथा सगळे कर्तबगारीचे आयुष्य सुखवस्तू परिस्थितीत घालवलेल्या कित्येकांना निवृत्तीनंतर गरिबीचे, आर्थिक हलाखीचे जीवन जगतांना पाहिल्याचे कितीतरी उदाहरणं आहेत.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, सरासरी आयुष्यमानात झालेली वाढ. साठीत निवृत्ती घेतली तरी पुढचे वीस-तीस वर्षे आणखी आयुष्य असू शकते. आणि ते आयुष्य उत्पन्नारहित असू शकते. त्या निवृत्ती नंतरच्या आयुष्याचे नियोजन हे महागाई दराला गृहीत धरूनच करावे लागेल.

महागाईचे आपल्या खिशावर काय परिणाम होतात?
समजा आज तुमच्याकडे ₹१ लाख आहेत. आणि त्या पैशांची कुठेच गुंतवणूक न करता तुम्ही ते पैसे तसेच ठेवले. तर ७% महागाई दरात एक वर्षानंतर त्या पैशांची किंमत ७ हजार रुपयांनी कमी होईल. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ज्या वस्तू विकत घ्यायला आज तुम्हाला ₹१ लाख रुपये लागतील त्या वस्तू पुढच्या वर्षी ₹१ लाख ७ हजार रुपयांच्या झाल्या असतील.
महागाईशी कसे लढता येईल?
महागाईशी लढण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे आपल्या गुंतवणुकीवर महागाई पेक्षा अधिक दराने परतावा मिळवणे. त्यांचे विविध पर्याय कुठले असू शकतात यावर लवकरच लिहू.