
The Man from Earth हा माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक Science Fiction प्रकारातील चित्रपट आहे. थोड्या थोड्या काळानंतर मी तो बघतो. प्रत्येकवेळी विचारांना नवा आयाम मिळत जातो.
जॉन ओल्डमॅन नावाचा एक पस्तिशीतला एक कॉलेज प्रोफेसर अचानक त्याची नोकरी सोडतो. त्याला ज्या दिवशी शहर सोडायचे असते त्या दिवशी त्याचे काही मित्र, सहकारी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जमतात. त्याने अचानक का नोकरी सोडली तो आता कुठे चालला आहे असे प्रश्न विचारले जातात. जॉन आपल्या पद्धतीने सांगतो की तो दर दहा वर्षांनी नवीन ठिकाणी स्थलांतर करतो. एका ठिकाणी थांबत नाही. असं का म्हणून त्याला काहीजण खोलवर प्रश्न विचारतात आणि मग तो अचानक म्हणतो, की तो १४,००० वर्षे वयाचा पुरुष आहे ज्याचे शरीर म्हातारे होत नाही. त्याच्या शरीराचे वृद्ध होणे थांबले आहे. त्याचे उत्तर ऐकून इतर लोक हसू लागतात. त्यांना वाटतं जॉन टवाळकी करतो आहे, मग ते त्याच्याशी टिंगल करण्याच्या सुरात बोलू लागतात. त्यांचे संभाषण टिंगल टवाळीपासून सुरु होते आणि हळूहळू गंभीर रूप धारण करते. या सगळ्यात जॉन एखाद्या स्थितप्रज्ञ संतासारखा बोलत असतो. निर्विकार भावनेने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असतो. हा सगळा संवाद जॉन सोडत असलेल्या घरात घडतो. या संवादातून ज्या तात्विक, वैज्ञानिक, ऐतिहासिक, मानववंशशास्त्रीय विषयांशी निगडित चर्चा घडतात त्या प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. या चर्चांमधून कुठल्याही प्रश्नांचे उत्तर दिलेले नाही पण प्रेक्षकांची उत्सुकता चाळवून अतिशय महत्वाच्या प्रश्नांना मांडले आहे.
१४,००० वर्षांपासून जग बघत असणाऱ्या जॉनचे भावविश्व ऐकतांना वेळोवेळी अंगावर रोमांच उभे राहतात. ही चर्चा तत्वज्ञानाची रुक्ष चर्चा म्हणून उरत नाही तर जॉनला विचारलेले इतिहासाविषयीचे प्रश्न आणि त्यांना जॉनने दिलेले उत्तर यातून इतिहास, तत्वज्ञान एका वेगळ्या शैलीत आपल्यापुढे उभे राहतात. वेळ म्हणजे नक्की काय आहे? इतका मोठा वेळ एखाद्या व्यक्तीला मिळाला तर वेळेचे महत्व उरेल का? या व्यक्तीने इतका मोठा इतिहास आपल्या डोळ्यांनी पहिला आहे तर त्याची जगाकडे बघण्याची दृष्टी कशी असेल?
ऐतिहासिक प्रश्नांना उत्तरं देतांना जॉनचे त्या ऐतिहासिक घटनांविषयीचे मत एकदम आऊट ऑफ द बॉक्स असतात. तो म्हणतो इतिहास हा सत्ताधीशांनी आपल्या पद्धतीने लिहिलेला असतो. सत्ताधीश बदलले तर ते इतिहास सुद्धा बदलू शकतात. आणि हे हजारो वर्षांपासून सुरु आहे. तुम्ही आजच्या काळात उभे राहून भूतकाळात घडलेल्या इतिहासाला योग्य रीतीने समजू शकत नाही. जॉनने प्रत्यक्ष पाहिलेला इतिहास नंतर लिहिला गेलेला इतिहास यात मोठा फरक असतो. बहुतांश इतिहास हा काल्पनिक आणि अजेंडा रेटण्यासाठी आहे असे तो सांगतो. अगदी लिखित स्वरूपातील नोंदी सुद्धा निवडक आणि सोयीस्कर रीतीने ठेवलेल्या आहेत असं जॉनचं म्हणणे असते. मानवाला आपल्या छोट्याशा आयुष्यात घडलेल्या घटना सुद्धा ठळक आठवत नाहीत तर मौखिक आणि लिखित स्वरूपातील इतिहास किती अचूक असेल आणि तेही तो इतिहास जेव्हा सत्ताधीशांनी लिहून घेतला असेल तेव्हा. इतिहासाविषयी आपण आज जे सत्य म्हणून मान्य करतो त्या बहुदा निवडक आणि सोयीस्कर रीतीने मांडलेल्या नोंदी आहेत.
सगळे धर्म हे तत्वज्ञानाचे पौराणिकीकरण आहेत. तत्वज्ञान आणि धर्म या वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक ग्रेट तत्वज्ञानाने मानवाच्या मुक्तीचे मार्ग सांगितले पण कालांतराने धर्माच्या ठेकेदारांनी त्याच तत्ववेत्यांचे दैवतीकरण करून त्या अगाध तत्वज्ञानाचे पौराणिकीकरण केले. प्रत्येक महान तत्वज्ञानाला कालांतराने धर्माने गुंडाळून घेतले. बऱ्याच वेळा हे तत्वज्ञान संघटित धर्मांनी निर्माण केलेल्या बंधनांतून सुद्धा मुक्तीचे मार्ग सांगत होते, पण तरीसुद्धा ते शेवटी संघटित धर्मांच्या घशात घातले गेले.
हे सांगतांना जॉन म्हणतो, साधारण दोन हजार वर्षांपूर्वी तो पूर्वेकडे भटकत भारतापर्यंत आला. इथे त्याला बुद्ध भेटला. बुद्धाचे तत्वज्ञान क्रांतिकारी होते, शाश्वत होते. ते आजही तितकेच प्रस्तुत आहे. बुद्धाने जॉनचे आयुष्य बदलले. आणि मग ते तत्वज्ञान पश्चिमेकडे घेऊन जायचे या प्रेरणेने जॉन त्याच काळात पश्चिमेत आला. त्याने ते तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. बुद्धाच्या तत्वज्ञानामुळे पश्चिमेत मोठा समूह जॉनच्या मागे आला. जॉनने बुद्धाचे शांती, करुणा आणि Mindfulnes चे तत्वज्ञान शिकवायला सुरुवात केली. हे तत्वज्ञान तत्कालीन धर्मसत्तेला आणि राजसत्तेला आव्हान होते. त्यांनी जॉनला विरोध करायला सुरुवात केली. जॉनच्या तत्वज्ञानाचे पौराणिकीकरण करण्याचे प्रयत्न झाले. ते सगळे पाहून जॉनने त्या लोकांना सुद्धा सोडून दिले आणि तो तिथून गायब झाला. नंतर कालावधानाने त्या सगळ्या तत्त्वज्ञानाचे पौराणिकीकरण करण्यात आले. जॉन चे काय झाले असे विचारले असता त्याच्या crucifixion ची काल्पनिक स्टोरी बनवण्यात आली. आपल्याकडच्या संत तुकारामांची वैकुंठगमनाची स्टोरी आहे अगदी तशीच. जॉनच येशू ख्रिस्त होता असं तो म्हणत नाही पण तो म्हणतो की बुद्धाचे तत्वज्ञान पश्चिमेत पसरू नये म्हणून त्या तत्वज्ञानाचे पौराणिकीकरण करण्यासाठी येशू ख्रिस्त आणि त्याच्याभोवतीच्या काल्पनिक रंजक कथा गुंफल्या गेल्या. हे सांगत असतांना त्या रूम मध्ये बसलेली एक कर्मठ ख्रिश्चन बाईच्या भावना दुखावतात. आणि त्यांना इतर लोक कसे शांत करतात हे बघणे इंटरेस्टिंग आहे.
जॉनने मांडलेल्या ख्रिस्ताच्या या स्टोरीला काही संदर्भ आहे. येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील वय वर्षे १२ ते ३० या काळातील इतिहासाची काहीच नोंद नाही. या काळाला The “lost years” of Jesus असं म्हणतात. या काळात ख्रिस्त काय करत असतील याविषयी अनेक थियरी आहेत. त्यापैकी एक थेरी म्हणते की येशू ख्रिस्त त्या काळात भारतात आले होते आणि त्यांनी गौतम बुद्धाची दीक्षा घेतली होती. आणि नंतर ख्रिस्ताने बुद्धाचे तत्वज्ञान पश्चिमेकडे पसरवण्याचे ठरवले.
ख्रिस्ताच्या तत्वज्ञानाचे जसे पौराणिकीकरण करून संघटित धर्म निर्माण झाला अगदी तसाच बुद्धाच्या तत्वज्ञानाचा सुद्धा पूर्वेकडे संघटित धर्म निर्माण झाला. या धर्मांच्या जोरावर धर्मसत्तांनी आणि राजसत्तांनी मिळून मिसळून राज्य केले.
या लेखाचा उरलेला भाग नंतर कधीतरी टाकतो.
क्रमशः