नेटफ्लिक्स वर Vikings ही वेब सिरीज बघत होतो. Vikings हे मुख्यत्वे मध्ययुगीन Scandinavia मधील Norsemen लोकांच्यावर आधारलेली ऐतिहासिक वेब सिरीज आहे.
त्यात वेस्सेक्स इंग्लंड ची राणी ज्युडिथ ही वर्जिन मेरीचे चित्र काढत असते. त्या चित्रातील मेरीच्या कपड्यांचा पदर सुंदर निळ्या रंगाने रंगवत असते. तो निळा रंग बनवण्यासाठी राणी एक निळा स्फटिक रगडून त्याची भुकटी बनवते आणि त्यात पाणी मिसळून रंग बनवते. तितक्यात तिची सून तिला विचारते की हा निळा स्फटिक काय आणि कुठला आहे. राणी उत्तर देते: “याला Lapis lazuli म्हणतात, आणि हा रंग फार दुरून कुठून तरी आणला आहे.” Lapis lazuli हे नाव ऐकताच माझे मन भूतकाळातील आठवणीत फ्लॅशबॅक मध्ये गेले. २०१९ मध्ये अजिंठ्याच्या लेण्या पाहण्यासाठी गेलो होतो. तिथे जाण्यापूर्वी लेण्या विषयी लेण्यांविषयी थोडा अभ्यास करून गेलो होतो. तेव्हा हा शब्द वाचनात आला होता. सातव्या शतकात इंग्लंडची ज्युडिथ राणी मदर मेरी चे चित्र रंगवण्यासाठी वापरत असलेला निळा रंग त्याच काळात अजिंठ्याच्या लेण्यांमध्येही वापरला जात होता. अजिंठ्यातील कित्येक स्त्रियांचे कपडे याच रंगाने रंगवलेले आहेत. या रंगाविषयी थोडेसे.
Lapis lazuli हा दगड सध्याच्या अफगणिस्तान आणि इराणच्या काही भागात नैसर्गिकरित्या सापडतो. . या रंगाच्या सुंदर आणि विशिष्ट निळ्या रंगाच्या छटेमुळे या रंगाला मध्ययुगीन काळात जगभर मागणी होती. जवळजवळ दीड हजार वर्षांनंतरही अजिंठ्याच्या लेण्यांसह जगात इतर अनेक ठिकाणी या रंगाने रंगवलेले चित्र अजूनही शाबूत आहेत. भारतात या दगडाला राजवर्त हे नाव होते. या दगडांचे खडे मध्ययुगीन भारतीय राजे आणि श्रीमंत लोक दागिन्यांमध्ये आणि अंगठ्यांमध्ये वापरत. जसजसा सिल्क रोड मार्गे भारतीय उपखंड आणि युरोपमधील व्यापार वाढू लागला तसा या दगडाने युरोपमध्ये प्रवेश केला. हा रंग युरोपात पोहोचला आणि युरोपियन कलाकारांनी याला Ultramarine असे नाव दिले. Ultramarine म्हणजे सागराच्या निळाईपेक्षाही निळा.
हा दगड आणि त्याच्यापासून बनलेल्या रंगाला सोन्यापेक्षाही अधिक किंमत मिळत असे. युरोपमधील श्रीमंत रेनेसॉ चित्रकार या रंगाचा वापर करत. लिओनार्डो डा विंची च्या चित्रांमध्येही या रंगाचा वापर झालेला आहे. इजिप्त मधील प्रसिद्ध Tutankhamun च्या मुखवट्यामध्ये हा रंग वापरलेला आहे. अतिसुंदर राणी कलियोपात्रा या रंगाचा वापर आय शेड म्हणून वापरत असे म्हणतात. इतकेच काय अति प्राचीन सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा या रंगाचा वापर झालेला दिसतो.