Tag: Inflation

  • वाढत्या पगाराबरोबर तुमचे  राहणीमान अधिक खर्चिक होऊ देऊ नका

    Background Lifestyle” by Chatree Petjan/ CC0 1.0

    माझी पहिली नोकरी पुणे विद्यापीठात होती. विद्यापीठाच्या मागे खडकीत एका स्वस्त हॉस्टेल मध्ये मी १००० रुपये महिना भाडे देऊन राहत असे. विद्यापीठात चालत जात असे. एक वर्ष काम केल्यावर आयटी मध्ये चांगली नोकरी मिळाली म्हणून विद्यापीठ सोडले. जातांना माझे विद्यापीठातील बॉस डॉ. जयंत कीर्तने यांनी एक सल्ला दिला. ते म्हणाले, तुझा पगार तिथे दरवर्षी वाढत जाईल. फक्त त्या वाढत्या पगाराबरोबर तुझे राहणीमान अधिक खर्चिक होऊ देऊ नकोस, मी काय म्हणतोय हे तुला काही वर्षानंतर कळेल. आणि तु माझे आभार मानशील. त्यांच्या शब्दात, “Just don’t upgrade your lifestyle with rising income, you’ll thank me later”.  नंतर अर्थातच मी तो सल्ला शब्दशः पाळला. आणि सरांचे पुनःपुन्हा आभारही मानले.

    Parkinson’s Law नावाचा एक नियम आहे. तो नियम सांगतो, आपले खर्च हे आपल्या उत्पनाच्या पटीत वाढत जातात. लोकांचे उत्पन्न कितीही वाढले तरी त्याच पटीत ते खर्च वाढवत नेतात. त्यांचा पहिला पगार फार छोटा असतो, त्यातही ते मस्त जगत असतात. काही वर्षानंतर पगार कैक पटींनी वाढतो. आणि मग तोही पुरेनासा होत जातो. मग त्या पगारातून बचत करणे, गुंतवणूक करणे फार दूरची गोष्ट असते. ज्यांना Parkinson’s Law ला हरवता येतं, ते लवकरच एक विलक्षण स्वातंत्र्य उपभोगायला लागतात.

    महिना ५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या काही लोकांचेही महिना अखेरीला बचत खाते रिकामे झालेले पाहिलेले आहे. आणि महिना ५० हजार कमावणारेही १०-१५ हजारांची मासिक बचत करतांना पहिले आहेत.

    मी शेअर्स गुंतवणुकीच्या निमित्ताने कंपन्यांचे वार्षिक अहवाल (Annual Report) वाचत असतो. माझ्या वाचनातून एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली, कार, कपडे, चपला-बूट, मोबाईल, दुचाकी या प्रकारच्या वस्तू ज्या काही वर्षानंतर जुन्या होतात त्यांना ग्राहकाने लवकर बदलावे किंवा अपग्रेड करावे यासाठी सुद्धा या कंपन्यांच्या मार्केटिंग आणि सेल्स टीम्स काम करत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर पायात घालायचे शुज हे पूर्वी सरासरी १२ ते १८ महिने वापरले जायचे आणि मग ते बदलले जायचे. आता तो काळ ८ महिन्यांवर आला आहे. 

    मोबाइल कितीही लेटेस्ट घेतला तरी पाच सहा महिन्यात त्याचे दुसरे मॉडेल बाजारात अवतरते आणि तुमचा मोबाइल जुना होऊन जातो. तुम्ही एकदम लेटेस्ट मॉडेलची कार घेता, वर्षाच्या आत त्याच कार चे नवे मॉडेल येते, आणि तुमची कार जुनी वाटू लागते. मग तुम्ही नेक्स्ट अपग्रेड प्लॅन करत राहता. पुढची पगारवाढ, पुढचा बोनस त्यासाठी वापरला जातो.

    औद्योगिक क्रांतीने सामान्यांच्या हाती पैसे खेळवले, पण तेच पैसे परत महिन्याच्या महिन्याला श्रीमंतांकडे परत कसे जात राहतील याचीही सोय केली. सामान्यांचे पगार वाढले, मग त्यांच्या घरांचा आकार वाढला, मग कारचा आकार वाढला, मग लाख-दोन लाख किमतीचे फोन दर तीन वर्षांनी बदलण्याची गरज निर्माण झाली, घरातले फर्निचर दर ४-५ वर्षांनी बदलण्याची गरज निर्माण झाली, एका शूज च्या जागी अनेक जोड आले, वॉर्डरोब कपड्यांनी भरले. यादी फार मोठी आहे.

    या दुष्ट चक्रातून स्वतःची सुटका करण्यासाठी मुक्त विचार हवे आहेत. आपल्या खांद्यावर आपलेच डोके हवे आहे. मार्केट, सोशल मीडिया, तुमचे सोशल सर्कल तुम्हाला नेहमी पळायला लावत राहील. तुम्ही ठरवायचे आहे. किती पळायचे. आणि हे पळणेही गोल रिंगणात पळणे आहे. शेवटी तुम्ही होता तिथेच पोहोचणार आहात.

    शाश्वत संपत्तीनिर्मितीसाठी आवश्यक असलेली पहिली गोष्ट ही की, तुमची जीवनशैली कशी अपग्रेड करायची याचे तारतम्य असणे. तुमची जीवनशैली खूप वेगाने अपग्रेड करू नका. जे लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा खूप साधे आयुष्य जगू शकतात ते अशा स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतात जे त्यांची जीवनशैली सुधारण्यात व्यस्त आहेत हे समजूच शकत नाही.

    फक्त एवढेच करा, एकदा का तुमच्याकडे सर्व बेसिक गरजा पूर्ण करण्यापुरते पैसे आले, आणि त्यानंतर जेव्हा तुमचे उत्पन्न वाढत गेले तरीही तुम्ही तुमच्या जगण्यात बदल न करता आधीसारखे जगायचे आहे, अतिरिक्त उत्पन्न मिळते आहे म्हणून लगेच घर, जीवनशैली आणि स्टेटस सिम्बॉल दाखवणाऱ्या त्या सर्व इतर गोष्टी अपग्रेड करण्याची घाई करू नका. कुठेतरी थांबा.

    समजा आज तुम्हाला महिन्याला १ लाख पगार मिळवत आहात. गोष्ट अशी आहे की, जेव्हा तुम्ही अशा उत्पन्नावर पोहोचता, तेव्हा तुम्ही सहसा छोट्या उत्पन्नापासून सुरुवात करता, जसे २५ हजार रुपये महिना आणि मग हळू हळू ते उपन्न वाढत जाते. ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. हे घडत असताना, एक प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही जसे अधिकाधिक पैसे कमावत जाता तसे तुम्ही तुमची जीवनशैली अपग्रेड करत जाता. आणि त्या अपग्रेडिंगलाच तुम्ही संपत्ती समजता आणि हळुवारपणे तुम्ही या चंगळवादी सापळ्यात फसत राहता.

    नसीम तालेब म्हणतात, “सर्वात धोकादायक गोष्टी म्हणजे हेरॉईन आणि मासिक पगार.” बरोबर, कारण या गोष्टी खूप व्यसनशील आहेत. थोडक्यात सांगायचे तर संपन्नतेकडे जाण्याचा सुयोग्य मार्ग कुठला तर आधी गरीब बनून जगता येणे. वाढत्या उत्पन्नाबरोबर आपला खर्च  वाढवत नेऊन त्या आर्थिक गुलामगिरीत न फसणे. 

  • महागाई तुम्हाला गरिबीकडे लोटते आहे.

    असे म्हणतात,

    “महागाई म्हणजे जेव्हा तुम्ही शंभर रुपयांच्या हेअरकट साठी दीडशे रुपये देतात ज्यासाठी तुम्ही पन्नासच रुपये द्यायचे जेव्हा तुमच्या डोक्यावर केस होते.”

    सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो हे जितके त्रिकालाबाधित सत्य आहे, तितकेच प्रत्येक वस्तूची किंमत वाढत जाणार म्हणजेच महागाई वाढणार हे सुद्धा सत्य आहे.

    महागाईचा विचार करून आपल्या भविष्यचे नियोजन करणे फार महत्वाचे आहे. अन्यथा आपण स्वतःच्या हाताने आर्थिक तणावांना निमंत्रण देऊ शकतो.

    महागाईला उदाहरणासह समजून घेऊ. समजा भारतात सरासरी महागाईचा दर ७% आहे. याचा अर्थ असा होतो की आज ज्या वस्तूची किंमत ₹ १०० आहे ती वस्तू अजून एक वर्षाने १०७ रुपयांची होईल. हे झाले एक वर्षाचे. पण तिथून पुढे काय? तर, पुढे आणखी एका वर्षाने त्या वास्तूच्या किमतीत ७% दराने वाढ झाली तर तिची किंमत १०७ रुपयांच्या ७% म्हणजे १०७ + ७.५ = ₹ ११४.५० होईल. आणि अशाच रीतीने चक्रवाढ दराने म्हणजेच दर साल दर शेकडा (द. सा. द. शे.) दराने वाढत जाईल.

    हे सगळे का महत्वाचे आहे?

    भविष्याचे नियोजन करतांना महागाईत होणारी वाढ गृहीत धरणे फार महत्वाचे आहे. 

    कसे?

    समजा आज तुमच्या कुटुंबाला एक आरामदायी आयुष्य जगण्यासाठी महिन्याला ₹५०,००० लागतात. आज तुमचे वय ४० असेल आणि अजून १५ वर्षांनी तुम्ही निवृत्त होण्याचे नियोजन करत असाल तर असेच आयुष्य जगण्यासाठी अजून १५ वर्षानंतर किती पैसे लागतील याचे गणित करण्यासाठी महागाई गृहीत धरून तुम्ही गणित केले पाहिजे. सरासरी ७% महागाई दर गृहीत धरला तर अजून १५ वर्षानंतर अशीच जीवनशैली जगण्यासाठी अंदाजे ₹ १ लाख ४० हजार महिन्याला लागतील. आणि वीस वर्षानंतर अंदाजे ₹२ लाख लागतील. या गणितात आपण खूप साधे अंदाज करून ७% हा सरकारी आकडा गृहीत धरतो आहोत. खरं म्हणजे प्रत्येकाची महागाई वेगळी असते. जसे, शाळेची फी १०% द. सा. द. शे. दराने वाढू शकते. आरोग्य सेवांचा आणि शिक्षणाच्या किंमतीचा महागाई दर फार जास्त असू शकतो.

    महागाई दारात होणाऱ्या वाढी गृहीत धरूनच निवृत्तीचे नियोजन करावे लागेल. अन्यथा सगळे कर्तबगारीचे आयुष्य सुखवस्तू परिस्थितीत घालवलेल्या कित्येकांना निवृत्तीनंतर गरिबीचे, आर्थिक हलाखीचे जीवन जगतांना पाहिल्याचे कितीतरी उदाहरणं आहेत.

    दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, सरासरी आयुष्यमानात झालेली वाढ. साठीत निवृत्ती घेतली तरी पुढचे वीस-तीस वर्षे आणखी आयुष्य असू शकते. आणि ते आयुष्य उत्पन्नारहित असू शकते. त्या निवृत्ती नंतरच्या आयुष्याचे नियोजन हे महागाई दराला गृहीत धरूनच करावे लागेल.

    महागाईचे आपल्या खिशावर काय परिणाम होतात?

    समजा आज तुमच्याकडे ₹१ लाख आहेत. आणि त्या पैशांची कुठेच गुंतवणूक न करता तुम्ही ते पैसे तसेच ठेवले. तर ७% महागाई दरात एक वर्षानंतर त्या पैशांची किंमत ७ हजार रुपयांनी कमी होईल. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ज्या वस्तू विकत घ्यायला आज तुम्हाला ₹१ लाख रुपये लागतील त्या वस्तू पुढच्या वर्षी ₹१ लाख ७ हजार रुपयांच्या झाल्या असतील.

    महागाईशी कसे लढता येईल? 

    महागाईशी लढण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे आपल्या गुंतवणुकीवर महागाई पेक्षा अधिक दराने परतावा मिळवणे. त्यांचे विविध पर्याय कुठले असू शकतात यावर लवकरच लिहू.