Tag: Psychology

  • तात्पुरते मोह टाळा

    chess piece
    Photo by Pixabay on Pexels.com

    गुंतवणुकीविषयीच्या चर्चेत बऱ्याच वेळा असा तर्क केला जातो की भविष्याची चिंता करून आज तडजोडी का कराव्यात?  मिळाले ते पैसे खर्च करून मजेत आयुष्य का जगू नये? भविष्य कोणी पाहिले? 

    खरंतर या  तर्काला काही ठोस उत्तर नाहीये.  ही शेवटी प्रत्येकाची वैयक्तिक चॉईस आहे. तरीही सुखी भविष्यासाठी प्लॅन करायचा असेल तर त्यासाठी चालू वर्तमानात काही निर्णय घ्यावेच लागतील.  आजचे काही मोहाचे क्षण टाळून  भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील.  याच संदर्भातील एक महत्त्वाचा मानसशास्त्रीय प्रयोग समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

    १९६० साली स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये एक प्रयोग करण्यात आला. चार वर्षांच्या मुलांसमोर थोडी मिठाई ठेवण्यात आली.  आणि त्यांना सांगण्यात आले की ही मिठाई आता लगेच खाता येईल किंवा अजून पंधरा मिनिटे थांबले तर त्यांना अजून जास्त मिठाई देण्यात येईल. आणि त्या मुलांना रूममध्ये एकटे सोडण्यात आले.  पंधरा मिनिटांच्या आत  कोणी मिठाई खाल्ली किंवा न खाता नंतर मिळणाऱ्या मोठ्या बक्षिसासाठी वाट पाहिली याचा डेटा बनवण्यात आला. या मुलांवर कित्येक वर्षांपर्यंत नजर ठेवण्यात आली. हा प्रयोग कित्येक वर्षे चालला.  जी मुलं पंधरा मिनिटे वाट बघू शकली आणि अधिक मोठे बक्षीस घेऊ शकली ती मुलं नंतरच्या आयुष्यात, शिक्षणात, समाजाबरोबरच्या नात्यात, भावनिक दृष्ट्या अधिक सफल होत गेली.  ज्यांना मिठाई लगेच खाण्याचा मोह आवरला नाही त्यातल्या बऱ्याच मुलांना नंतरच्या आयुष्यात खडतर दिवसांना सामोरे जावे लागले, अपयश भोगावे लागले. 

    या प्रयोगाला मार्शम्यॅलो टेस्ट म्हणून ओळखले जाते. नंतर अशाच प्रकारचे अनेक प्रयोग करण्यात आले त्यांचे निष्कर्ष ही काही वेगळे नव्हते. 

    आजच्या दिवशी काही मोहाचे क्षण टाळून भविष्यातल्या मोठ्या प्रॉब्लेम पासून स्वतःला वाचवता येऊ शकते. आज काही छोट्या तडजोडी केल्या तर भविष्यातील मोठे संघर्ष टाळता येतील हा या प्रयोगामागचा मुख्य संदेश आहे. यालाच Delayed Gratification असेही म्हणतात. आणि Instant Gratification ही त्याच्याविरुद्धची संज्ञा आहे.

    Delayed Gratification  ची अनेक उदाहरणे सांगता येतील. जसे शालेय अवस्थेत असताना कोणीतरी टीव्ही बघण्याचा,  व्हिडिओ गेम खेळण्याचा मोह टाळून तो वेळ अभ्यासासाठी वापरतो  आणि मग भविष्यात त्याला अनेक पटींनी त्या Delayed Gratification ची फळे मिळतात. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. 

    भविष्य कितीही अनिश्चित असले तरी आपल्या परीने त्याचे प्लॅनिंग नक्कीच करता येईल.

    आपण आज ज्या झाडाचे फळे चाखतो ते झाड एका रात्रीत वाढत नाही. एक तर पंधरा-वीस वर्षांपूर्वी आपण किंवा आपल्या आधी इतर कोणीतरी ते लावलेले असते.  की ते चांगल्या गोष्टींची फळे मिळण्यास भरपूर काळ द्यावा लागतो.  आणि तितका संयम बाळगल्यास ती फळे कैक पटीने मिळू शकतात. 

    हे गुंतवणुकीविषयी फार जास्त समर्पक आहे. का?

    १. आपले उत्पन्न अमर्याद नाही ते कधीही थांबू शकते. 

    २. सततच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मागच्या काही दशकांपासून आपले आयुष्यमान वाढलेले आहे,  त्यामुळे रिटायरमेंट नंतर सुद्धा काही दशके आपण जिवंत राहू शकतो पण त्या काळात आपले उत्पन्न चालूच राहील याची शाश्वती नाही.  अगदी साठव्या वर्षापर्यंत जरी काम केले तरी पुढची एक दोन दशके उत्पन्न शिवाय जाऊ शकतात त्यासाठीची तरतूद महत्त्वाची आहे. 

    ३.  इन्फ्लेशन म्हणजेच महागाई तुमच्या कमाईला खात राहणार आहे.  एक दोन पिढ्यात तुमच्या पैशांचे कैक पटीने अवमूल्यन होऊ शकते.  त्या पैशांना योग्यरीत्या गुंतवलेले नसेल तर इन्फ्लेशन तुम्हाला गरिबीत ढकलू शकते. 

    सरकार चित्रपटात एक डायलॉग आहे तो मला फार आवडतो: “नजदिकी फायदा देखने से पहले; दूर का नुकसान सोचना चाहिए.”

  • वाढत्या पगाराबरोबर तुमचे  राहणीमान अधिक खर्चिक होऊ देऊ नका

    Background Lifestyle” by Chatree Petjan/ CC0 1.0

    माझी पहिली नोकरी पुणे विद्यापीठात होती. विद्यापीठाच्या मागे खडकीत एका स्वस्त हॉस्टेल मध्ये मी १००० रुपये महिना भाडे देऊन राहत असे. विद्यापीठात चालत जात असे. एक वर्ष काम केल्यावर आयटी मध्ये चांगली नोकरी मिळाली म्हणून विद्यापीठ सोडले. जातांना माझे विद्यापीठातील बॉस डॉ. जयंत कीर्तने यांनी एक सल्ला दिला. ते म्हणाले, तुझा पगार तिथे दरवर्षी वाढत जाईल. फक्त त्या वाढत्या पगाराबरोबर तुझे राहणीमान अधिक खर्चिक होऊ देऊ नकोस, मी काय म्हणतोय हे तुला काही वर्षानंतर कळेल. आणि तु माझे आभार मानशील. त्यांच्या शब्दात, “Just don’t upgrade your lifestyle with rising income, you’ll thank me later”.  नंतर अर्थातच मी तो सल्ला शब्दशः पाळला. आणि सरांचे पुनःपुन्हा आभारही मानले.

    Parkinson’s Law नावाचा एक नियम आहे. तो नियम सांगतो, आपले खर्च हे आपल्या उत्पनाच्या पटीत वाढत जातात. लोकांचे उत्पन्न कितीही वाढले तरी त्याच पटीत ते खर्च वाढवत नेतात. त्यांचा पहिला पगार फार छोटा असतो, त्यातही ते मस्त जगत असतात. काही वर्षानंतर पगार कैक पटींनी वाढतो. आणि मग तोही पुरेनासा होत जातो. मग त्या पगारातून बचत करणे, गुंतवणूक करणे फार दूरची गोष्ट असते. ज्यांना Parkinson’s Law ला हरवता येतं, ते लवकरच एक विलक्षण स्वातंत्र्य उपभोगायला लागतात.

    महिना ५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या काही लोकांचेही महिना अखेरीला बचत खाते रिकामे झालेले पाहिलेले आहे. आणि महिना ५० हजार कमावणारेही १०-१५ हजारांची मासिक बचत करतांना पहिले आहेत.

    मी शेअर्स गुंतवणुकीच्या निमित्ताने कंपन्यांचे वार्षिक अहवाल (Annual Report) वाचत असतो. माझ्या वाचनातून एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली, कार, कपडे, चपला-बूट, मोबाईल, दुचाकी या प्रकारच्या वस्तू ज्या काही वर्षानंतर जुन्या होतात त्यांना ग्राहकाने लवकर बदलावे किंवा अपग्रेड करावे यासाठी सुद्धा या कंपन्यांच्या मार्केटिंग आणि सेल्स टीम्स काम करत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर पायात घालायचे शुज हे पूर्वी सरासरी १२ ते १८ महिने वापरले जायचे आणि मग ते बदलले जायचे. आता तो काळ ८ महिन्यांवर आला आहे. 

    मोबाइल कितीही लेटेस्ट घेतला तरी पाच सहा महिन्यात त्याचे दुसरे मॉडेल बाजारात अवतरते आणि तुमचा मोबाइल जुना होऊन जातो. तुम्ही एकदम लेटेस्ट मॉडेलची कार घेता, वर्षाच्या आत त्याच कार चे नवे मॉडेल येते, आणि तुमची कार जुनी वाटू लागते. मग तुम्ही नेक्स्ट अपग्रेड प्लॅन करत राहता. पुढची पगारवाढ, पुढचा बोनस त्यासाठी वापरला जातो.

    औद्योगिक क्रांतीने सामान्यांच्या हाती पैसे खेळवले, पण तेच पैसे परत महिन्याच्या महिन्याला श्रीमंतांकडे परत कसे जात राहतील याचीही सोय केली. सामान्यांचे पगार वाढले, मग त्यांच्या घरांचा आकार वाढला, मग कारचा आकार वाढला, मग लाख-दोन लाख किमतीचे फोन दर तीन वर्षांनी बदलण्याची गरज निर्माण झाली, घरातले फर्निचर दर ४-५ वर्षांनी बदलण्याची गरज निर्माण झाली, एका शूज च्या जागी अनेक जोड आले, वॉर्डरोब कपड्यांनी भरले. यादी फार मोठी आहे.

    या दुष्ट चक्रातून स्वतःची सुटका करण्यासाठी मुक्त विचार हवे आहेत. आपल्या खांद्यावर आपलेच डोके हवे आहे. मार्केट, सोशल मीडिया, तुमचे सोशल सर्कल तुम्हाला नेहमी पळायला लावत राहील. तुम्ही ठरवायचे आहे. किती पळायचे. आणि हे पळणेही गोल रिंगणात पळणे आहे. शेवटी तुम्ही होता तिथेच पोहोचणार आहात.

    शाश्वत संपत्तीनिर्मितीसाठी आवश्यक असलेली पहिली गोष्ट ही की, तुमची जीवनशैली कशी अपग्रेड करायची याचे तारतम्य असणे. तुमची जीवनशैली खूप वेगाने अपग्रेड करू नका. जे लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा खूप साधे आयुष्य जगू शकतात ते अशा स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतात जे त्यांची जीवनशैली सुधारण्यात व्यस्त आहेत हे समजूच शकत नाही.

    फक्त एवढेच करा, एकदा का तुमच्याकडे सर्व बेसिक गरजा पूर्ण करण्यापुरते पैसे आले, आणि त्यानंतर जेव्हा तुमचे उत्पन्न वाढत गेले तरीही तुम्ही तुमच्या जगण्यात बदल न करता आधीसारखे जगायचे आहे, अतिरिक्त उत्पन्न मिळते आहे म्हणून लगेच घर, जीवनशैली आणि स्टेटस सिम्बॉल दाखवणाऱ्या त्या सर्व इतर गोष्टी अपग्रेड करण्याची घाई करू नका. कुठेतरी थांबा.

    समजा आज तुम्हाला महिन्याला १ लाख पगार मिळवत आहात. गोष्ट अशी आहे की, जेव्हा तुम्ही अशा उत्पन्नावर पोहोचता, तेव्हा तुम्ही सहसा छोट्या उत्पन्नापासून सुरुवात करता, जसे २५ हजार रुपये महिना आणि मग हळू हळू ते उपन्न वाढत जाते. ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. हे घडत असताना, एक प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही जसे अधिकाधिक पैसे कमावत जाता तसे तुम्ही तुमची जीवनशैली अपग्रेड करत जाता. आणि त्या अपग्रेडिंगलाच तुम्ही संपत्ती समजता आणि हळुवारपणे तुम्ही या चंगळवादी सापळ्यात फसत राहता.

    नसीम तालेब म्हणतात, “सर्वात धोकादायक गोष्टी म्हणजे हेरॉईन आणि मासिक पगार.” बरोबर, कारण या गोष्टी खूप व्यसनशील आहेत. थोडक्यात सांगायचे तर संपन्नतेकडे जाण्याचा सुयोग्य मार्ग कुठला तर आधी गरीब बनून जगता येणे. वाढत्या उत्पन्नाबरोबर आपला खर्च  वाढवत नेऊन त्या आर्थिक गुलामगिरीत न फसणे. 

  • Results or Hardwork?

    Workers in a Machine Tool Shop (oil painting)
    Workers in a Machine Tool Shop (oil painting) by Douglas Pittuck is licensed under CC-BY-NC-SA 4.0

    मागे एकदा एका इंटरेस्टिंग व्यक्तीला भेटलो. ते अमेरिकेत शिकले होते आणि शिक्षण चालू असताना कमाई म्हणून ते कीमेकर (नकली चावी बनवणारा) चे काम करायचे. त्यांनी काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या.
    बऱ्याच वेळा लोक चावी विसरल्यामुळे आपल्या घराच्या बाहेर अडकायचे. असे घडल्यावर बरेच लोक तणावात जातात. मग जेव्हा कीमेकर ला पाचारण केल्यावर तो अवतरतो तेव्हा देवदूत अवतरल्यासारखे भासते. हा की मेकर जेव्हा नवखा होता तेव्हा सहजासहजी कुलूप उघडत नसे. त्याला बराच वेळ लागायचा. हे सगळे करत असताना त्याला बरेच कष्ट घ्यावे लागत. खूप वेळा उठ बस करावी लागे. कधी घामाने अंग ओले होऊन जाई. बराच वेळ खटपट केल्यावर शेवटी कुलूप उघडले जाई आणि मग सर्व कुटुंबीय आपल्याच घरात जाऊ शकत. त्यांना एक वेगळा आनंद होत असे. आणि मग की मेकर ला तो मागेल तितके पैसे ते आनंदाने देत असत.
    कालांतराने हा कीमेकर आपल्या कामात एक्सपर्ट होऊ लागला. कुलूप उघडायला त्याला कमी वेळ लागू लागला. फार कष्ट पडत नसत. काही दिवसांनी तर तो काही मिनिटातच कुलूप उघडू लागला. त्याचा कामाचा वेग वाढला. तो सहजासहजी कुलूप उघडतो आहे, हे बघून बऱ्याच वेळा लोक त्याला पैसे देताना खळखळ करायचे. ते म्हणायचे की दोन तीन मिनिटांचं तर काम होतं त्यात इतके पैसे का मागताय? त्याने सहज कुलूप उघडले, कमी वेळ घेतला यामुळे त्याच्या श्रमाचे मूल्य लोकांच्या दृष्टीने कमी होऊ लागले.
    हा की मेकर हुशार होता, त्याला ही गोष्ट कळली. मग नंतर तो जाणून बुजून हे काम पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ घेऊ लागला. दोन मिनिटात होऊ शकणारे काम वीस तीस मिनिटे रखडून ठेवू लागला. मी खूप कष्ट करतो आहे असे भासवू लागला. तसे केल्यावर त्याचे पैसे देताना खळखळ करणारे ग्राहक कमी होऊ लागले. या अनुभवातून त्याला ही जाणीव झाली की बऱ्याच वेळा किती महत्त्वाचे काम पूर्ण केले यापेक्षा ते काम करताना किती कष्ट केले यावर लोक जास्त इम्प्रेस होतात. स्मार्ट वर्क जरी हार्ड वर्क पेक्षा भारी असले तरी हे लक्षात घ्यावे लागेल की वैयक्तिक निकाल मिळवण्यासाठी स्मार्टवर्क गरजेचे आहे. इतरांसमोर भासवण्यासाठी हार्डवर्क केल्याचे नाटक करावे लागेल.
    हा किस्सा इथे संपत नाही, ती व्यक्ती फायनान्स वर्ल्ड मध्ये उच्च पदावर काम करते आहे. आणि ते सांगत होते की, फायनान्स आणि कित्येक क्षेत्रात ही फिलॉसॉफी लागू पडते. बरेच लोक हार्डवर्क केल्याचे भासवतात. स्टॉक मार्केट पोर्टफोलिओ मॅनेजर कडे पोर्टफोलिओ चे नमुने तयार असतात, ते जसेच्या तसे लोकांना विकले जातात. पण त्यापूर्वी असे भासवले जाते की पोर्टफोलिओ मॅनेजर खूप मोठा रिसर्च करतो आहे, कस्टमरचा रिस्क प्रोफाइल जाणून घेऊन त्याच्यासाठी सूटेबल पोर्टफोलिओ बनवतो आहे. हे कष्ट भासवण्यासाठी, कस्टमरची वेगवेगळी माहिती मागितली जाते. हे काम गरज नसताना रखडले जाते, आम्ही अजूनही काम करतो आहोत असे पुन्हा पुन्हा सांगितले जाते. मुद्दाम डेडलाईन चुकवली जाते. आणि मग खूप कष्टाने त्या कस्टमरचा पोर्टफोलिओ बनवला आहे असे भासवले जाते. थोड्याफार फरकाने हीच बाब अनेक क्षेत्रात लागू पडते. कित्येक डॉक्टर्स पेशंटला मोठे मोठे फॉर्म भरायला सांगतात. त्यांची सगळी मेडिकल हिस्टरी जाणून घेण्याच्या नावाखाली पेशंटला इम्प्रेस करतात आणि मग रुटीन ट्रीटमेंट कडे वळतात. या प्रक्रियेतून किती प्रामाणिकपणे पेशंटची हिस्टरी वापरून ट्रीटमेंट प्लॅन बनवला यापेक्षा पेशंटला फार मोठे समाधान लाभते. हे सरसकट प्रत्येक व्यवसायिक करतो असे म्हणणे म्हणजे प्रामाणिक व्यावसायिकांवर अन्याय ठरेल. पण तरीही ही प्रॅक्टिस खूप जन करतात.

    आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये किती काम केले यापेक्षा तुमच्या कामाने किती व्हॅल्यू ॲड केली हे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात तासांपेक्षा तुम्ही किती महत्त्वाचा प्रॉब्लेम सोडवला हे महत्त्वाचे आहे. तुम्ही ज्याच्यासाठी काम करता म्हणजे तुमचा एम्प्लॉयर किंवा तुमचा कस्टमर त्याचा तुम्ही किती महत्त्वाचा प्रॉब्लेम सोडवला आणि त्यातून त्याला किती लाभ झाला यावर तुम्हाला मिळणारा मोबदला ठरावा लागतो. पण सगळीकडे असे होत नाही. बरेच लोक पैसे देताना समोरच्याला किती कष्ट पडले हे आधी बघतात. मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. मी जेव्हा एखादी सेवा पुरवतो तेव्हा ते करताना मला किती वेळ लागला यापेक्षा मी माझ्या ग्राहकाचा किती वेळ, पैसा वाचवला आणि त्याचे आयुष्य किती सोपे केले हे महत्त्वाचे.
    तसेही आज-काल, प्रत्यक्षात रिझल्ट देणाऱ्या राजकारण्यांपेक्षा, मी अठरा अठरा तास काम करतो असे भसवणारे राजकारणी जास्त प्रसिद्ध आहेत.

  • शाश्वत-कालातीत

    अमेझॉन चे जेफ बेझोस यांना विचारले होते की भविष्यात काय बदल होतील, तंत्रज्ञान कुठल्या मीडिया जात आहे, नवव्यवसायिकांनी भविष्याकडे कसे लक्ष द्यावे? त्यांनी फार सुंदर उत्तर दिले होते. ते म्हणतात, भविष्यात काय बदलेल यावर लक्ष देण्यापेक्षा काय बदलणार नाही हे लक्षात घेणे अधिक सुलभ आणि महत्त्वाचे आहे. ३० वर्षांपूर्वी जेव्हा अमेझॉन सुरू केली होती तेव्हा लोकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात आणि घरपोच हव्या होत्या. आजही लोकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात आणि घरपोच हव्या आहेत, आणि माझ्या मते भविष्यातही लोकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू माफक दरात आणि घरपोच हव्या असतील. ॲमेझॉन ची आयडिया शाश्वत आणि कालातीत आहे. त्या आयडियाची अंमलबजावणी करण्यासाठीचे तंत्रज्ञान कदाचित बदलत जाईल. पण मूळ आयडिया कालातीत आहे.
    प्रसिद्ध गणितज्ञ आणि विचारवंत नसीम निकोलस तलेब यांनी लिंडी इफेक्ट नावाचा एक सुंदर सिद्धांत मांडला आहे. ते म्हणतात एखादी आयडिया जितक्या मोठ्या काळापासून रूढ आहे, तर भविष्यातही तितक्याच किंवा त्याहूनही अधिकारासाठी ती आयडिया रूढीत राहीलच. हे तत्त्वज्ञान आपल्या आयुष्यात खूप गोष्टींना लागू पडते. तुम्हाला कुठली पुस्तकं वाचायची आहेत हे ठरवताना लिंडी इफेक्ट गृहीत धरून पुस्तकांची निवड करता येऊ शकते. जी पुस्तक कालातीत आहेत ती सर्वप्रथम वाचा. उदाहरणार्थ, सिद्धार्थ हे पुस्तक जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी प्रकाशित झाले. हे पुस्तक आजही तितकेच समर्पक आहे आणि माझ्या मते अजून हजार वर्षांनी ही या पुस्तकातील संदेशाशी त्याचे वाचक समर्पकता शोधू शकतील. गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान २६०० वर्षे जुने आहे, आजही त्याची समर्पकता तितकीच टिकून आहे. जेव्हा आपण असे कालातीतत ज्ञान शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खरंतर आपण आपला वेळच वाचवत असतो.
    मी आज जे काही शिकतो आहे ते माझ्या आयुष्यात अजून किती काळ लागू पडणार आहे त्यानुसार जर मी माझा प्राधान्यक्रम ठरवला तर माझी ज्ञानसाधना शाश्वत रूप घेऊ लागते.
    लॉन्ग टर्म इन्वेस्टिंग मध्ये असा विचार केल्याने खूप फायदा देऊ शकणारे पोर्टफोलिओ उभे करता येऊ शकतात.
    हीच गोष्ट आयुष्यात बऱ्याच बाबींमध्ये मदत करू शकते. तत्पूर्वी लॉंग टर्म विचार करायला शिकणे आवश्यक आहे.

  • आर्थिक नियोजन म्हणजेच सेल्फ डिफेन्स

    strong ethnic fighter showing punching technique during training
    Photo by Julia Larson on Pexels.com

    मध्ययुगात किंबहुना ५०-६० वर्षांपूर्वी सुद्धा स्वसंरक्षण म्हणजेच सेल्फ डिफेन्स हे जीवनावश्यक कौशल्य होते. ते नसेल तर कुणाचेही बाराच्या भावात मरण होत असे. आज काळ बदलला आहे.
    जीवनावश्यक म्हणून कौशल्यांची यादी करायची झालीच तर, आर्थिक नियोजन हे कौशल्य यादीत फार वरती यायला हवे. आपल्या पैशांना वाचवायला, वाढवायला आणि त्यांचे रक्षण करायला शिकणे फार महत्त्वाचे आहे.
    आधी तलवार आणि परशू घेऊन डाकू तुम्हाला लुटायचे आज पांढऱ्या कॉलरचे कपडे घालून आणि टाय लावलेले व्हाईट कॉलर डाकू तुम्हाला लुटताहेत. पूर्वीचे गुलाम साखळदंडात बांधलेले असायचे आजचे गुलाम क्रेडिट कार्डात, कर्जाच्या हफ्त्यात आणि टिविवर-सिनेमांत दाखवलेल्या आभासी चमकत्या जगाचे प्रलोभन दाखवून बांधून ठेवलेत.
    ३१ तारखेला टॉप अप झालेले बँक अकाउंट पुढच्या महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत रिकामे होत असेल तर आर्थिक नियोजन नावाचे जीवनावश्यक कौशल्य शिकून घ्यायची तुम्हाला गरज आहे.

    उत्पन्न अमर्याद नाही.
    खर्च सरणावर जाईपर्यंत आहे.

  • Man in the car paradox

    जेव्हा आपण एखादी छान कार पाहतो तेव्हा आपण क्वचितच विचार करतो, “व्वा, ती गाडी चालवणारा माणूस काय मस्त आहे.” त्याऐवजी, आपण विचार करतो, “व्वा, माझ्याकडे ती कार असती तर लोकांना वाटेल की मी किती मोठा माणूस आहे.” कळत-नकळत सगळेच लोक असा विचार करतात. 

    इथेच मानवी विचारात एक विरोधाभास आहे: लोकांना संपत्ती हवी आहे, फक्त यासाठी जेणेकरून इतरेजन त्यांचा आदर करतील, इतरांना ते आवडतील. परंतु संपत्तीच्या प्रदर्शनाने इतरांना तुम्ही कधीच आवडत नसतात. याचा अर्थ असा होत नाही की जग संपत्त्तीचा किंवा तुमचा तिरस्कार करतं. जग तुमच्या वस्तूंना, संपत्तीला मापदंड (benchmark) म्हणून वापरते. म्हणजे काय? 

    जेंव्हा तुम्ही तुमच्या कारचा, महागड्या घड्याळाचा, मोठ्या घराचा, दागिन्यांचा, उंची कपड्यांचा वापर इतरांना प्रभावित करण्यासाठी करता, तेव्हा ते इतर जण तुमचा आदर करण्या ऐवजी तुमच्या भौतिक वस्तूंचा आदर करतात आणि त्या वस्तू त्यांच्याकडे कधी येतील याचाच विचार करतात. तुमच्या महागड्या कारच्या ड्रायविंग सीट वर कोण बसले आहे, इकडे कुणाचेच लक्ष नसते. कार कडे बघणारे ती तशी कार त्यांच्याकडे कधी येईल फक्त याचाच विचार करतात. हेच तुमच्या मोठ्या घराला, दागिन्यांना, आय-फोनला आणि इतर सर्व फॅन्सी वस्तूंना लागू पडते.

    जर आपल्याला वाटत असेल, की महागडी कार, मोठं घर यामुळे आपण जगाच्या आदरास, प्रशंसेस पात्र होऊ. तर तसे कधीच होत नाही. विशेष करून त्या लोकांकडून ज्यांच्या आदराची प्रशंसेची आपण कदर करतो.